जळगाव : आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते हटिया दरम्यान साप्ताहिक उत्सव विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांमुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मध्य भारत आणि झारखंडदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. मात्र, या गाड्यांना जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ येथे या गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत.
एलटीटी–हटिया गाडीच्या तीन फेऱ्या
गाडी क्रमांक ०८६१० लोकमान्य टिळक टर्मिनस–हटिया साप्ताहिक विशेष १३ ते २७ ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता हटिया येथे पोहोचेल. या कालावधीत या गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत.
हटिया–एलटीटी परतीच्या तीन सेवा
गाडी क्रमांक ०८६०९ हटिया–लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष १२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी धावेल. हटिया येथून ही गाडी दुपारी ४.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्याही तीन फेऱ्या होणार आहेत.
जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी थांबा
या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, बानो, गोबिंदपूर रोड आणि बालसीरिंग या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना चाळीसगाव, पाचोरा किंवा भुसावळ स्थानकावरून या विशेष गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
२२ डब्यांची गाडी
या उत्सव विशेष गाडीला एक वातानुकूलित प्रथम/द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सात वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी तसेच दोन द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल. त्यामुळे विविध श्रेणीतील प्रवाशांसाठी आसनांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
रेल्वे आरक्षणासाठी ‘रेलवन’चा पर्याय
विशेष गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी प्रवासी ‘रेलवन’ ॲपचा वापर करू शकतात. तसेच या गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन आणि प्रस्थानाच्या सविस्तर वेळेसाठी भारतीय रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळावर किंवा एनटीईएस ॲपवर माहिती पाहता येणार आहे. उत्सवाच्या काळातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता या विशेष सेवेमुळे मुंबईकडून झारखंडच्या दिशेने तसेच परतीच्या प्रवासासाठी अतिरिक्त रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
