महाविद्यालयीन तरुणाईच्या नाटय़ाविष्काराला वेगळा आयाम लाभावा, या उद्देशाने आयोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीला रविवारपासून सु्नॠवात होत आहे.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत आयरिस प्रॉडक्शन व स्टडी सर्कल हे टॅलेण्ट पार्टनर आहेत. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष. महाकवी कालिदास कला मंदिरात पहिल्या मजल्यावरील नाटय़ परिषदेच्या सभागृहात रविवारी सकाळी साडेनऊ वाजता प्राथमिक फेरीला सुरुवात होणार आहे. मागील वर्षी लोकांकिका स्पर्धेत ११ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यंदा ही संख्या १८ पर्यंत विस्तारली आहे. त्यात ग्रामीण भागातील तरुणाईचा सहभाग ठळकपणे अधोरेखित होत आहे. यंदा सहभागी संघांची संख्या वाढल्यामुळे रविवार व सोमवार या दोन दिवसांत प्राथमिक फेरी होईल. गत वेळी नाशिकच्या क. का. वाघ परफॉर्मिग आर्टस महाविद्यालयाच्या ‘हे राम’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीत धडक दिली होती. आपल्यातील कलागुण राज्यस्तरापर्यंत पोहचविण्यासाठी पुन्हा सर्व संघांनी नव्या दमाने तयारी केली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून नाटय़-चित्र क्षेत्राची कवाडे अधिक मोठय़ा स्वरूपात प्रत्येकासाठी खुली होणार आहेत. विद्यार्थ्यांचे कलागुण जोखून त्यांना मनोरंजन क्षेत्रात कामाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयरिश प्रॉडक्शनचे दीपक करंजीकर व विद्या करंजीकर हे निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व या संस्थेचे सहकार्य मिळाले आहे. प्राथमिक फेरीसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएफ आणि संपूर्ण स्पर्धेचे टेलिव्हिजन पार्टनर झी मराठी आहे.

आज सादर होणाऱ्या एकांकिका

’ ‘एमईटी’चे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय- ‘भारत माझा देश आहे’

’ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ- ‘एका गाढवाची गोष्ट’

’ क. का. वाघ महाविद्यालयाचे परफॉर्मिग आर्ट्स, नाटय़ विभाग- ‘जाने भी दो यारो’

’गु. मा. दां. कला आणि भ. वा. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर- ‘सेझवरील अंधार’

’ना. शि. प्र. मंडळाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी- ‘तो मारी पिचकारी, सनम मेरी प्यारी’

’के. आर. टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, वणी- ‘मीमांसा’

’के. पी. जी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी- ‘जीवाची मुंबई’

’शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च, सिन्नर- ‘टिळक इन ट्वेन्टीफस्ट सेंच्युरी’

’न. ब. ठाकूर विधि महाविद्यालय- ‘द परफेक्ट ब्लेंड’