संमेलनाच्या मांडवातून.. ; वादांचाही ‘समारोप’!

शेवटच्या भाषणापर्यंत एकमेकांचा वेध घेऊ पाहणारे टोकदार राजकीय बाण पुन्हा भात्यात विसावले आहेत

शफी पठाण, लोकसत्ता 

सा हित्य संमेलनाच्या निमित्ताने वर्षभरापासून खळाळणारा गोदावरीचा काठ आता शांत झालाय.. कालपर्यंत सलग रंगत असलेल्या मानापमानाच्या कलगीतुऱ्यांनी तडजोडीचा मध्यममार्ग स्वीकारला आहे.. शेवटच्या भाषणापर्यंत एकमेकांचा वेध घेऊ पाहणारे टोकदार राजकीय बाण पुन्हा भात्यात विसावले आहेत. संमेलनाच्या समारोपसोबतच जणू वादांचाही ‘समारोप’ झाला आहे, पण या वादांनी संमेलनाच्या प्रतिष्ठेचे जे नुकसान केले ते भरून निघणारे नाही.

या वादांचे श्रेय जसे महामंडळाचे आहे तसे आयोजकांचेही आहे. ते जसे सत्ताधाऱ्यांचे आहे तसे विरोधकांचेही आहे. नाशिक की दिल्ली इथून सुरू झालेला वाद अखेर नाशिकच्या वेशीवर येऊन थांबला खरा, पण तो वादांचा केवळ विसावा होता. खरा वाद तर नाशिकच्या वेशीवरूनच सुरू झाला. यामागे वरवर आर्थिक कारणे वाटत असली तरी अहंकाराचा दर्प जाणवतच होता. हे संमेलन महामंडळचे आहे हे मान्यच, पण केवळ महामंडळाच्या बळावर संमेलन आयोजित होऊ शकत नाही, हे वास्तव कसे नजरेआड करणार? आणि वास्तव बदलता येत नसेल तर ते मान्य करण्यातच शहाणपण आहे. मग हे शहाणपण महामंडळाने का दाखवले नाही? शब्दयात्रेतील गठ्ठाभर पानांवर पसाभर आरोपांची जत्रा भरवण्याची खरंच काही गरज होती का? आणि ते सर्व आरोप खरे होते तर महामंडळ त्यावर अटळ का राहिले नाही? अशी कुठली विवशता होती जिने महामंडळाला तडजोडीस बाध्य केले? असेच काही प्रश्न आयोजकांनाही आहेतच.

संमेलनाला आर्थिक बळ पुरवले म्हणजे संमेलन ठोक भावात विकत घेतले, असा त्याचा अर्थ होतो का? महामंडळाला विश्वासात घेऊन नियोजन करण्यात काय कमीपणा होता? आरोपाच्या प्रश्नांना आरोपानेच उत्तर देणे गरजेचे होते का? निवडणुकीला फाटा देऊन सर्वसंमतीने अध्यक्ष निवडण्याचा निर्णय महामंडळाचाच होता ना? मग, फादर असोत की नारळीकर, अध्यक्ष निवडताना त्यांच्या प्रकृतीची माहिती महामंडळाला नव्हती का? होती तरी त्यांना तुम्ही अध्यक्षपदाचा सन्मान दिला याचा अर्थ त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे, हे तुम्हाला मान्य आहे ना? मग, त्यांचा मोठेपणा दुर्लक्षून त्यांच्या शारीरिक व्याधींवर मंचावरून बोट ठेवताना वावगे कसे वाटले नाही? हे झाले साहित्यिकांचे. तिकडे राजकारण्यांनीही संमेलनाला बदनाम करण्याची संधी सोडली नाही. क्षुल्लक कारणावरून या मायमराठीच्या गौरव सोहळ्याला वेठीस धरले गेले. वैचारिक दैवताबद्दल आस्था असायलाच हवी, पण मंचावरचा राजकीय प्रभाव सोडला तर मंचाखालील जनता गर राजकीयच होती. या जनतेच्या मनातील मराठी प्रेमाला सलाम करण्यासाठी तरी संमेलनाचा उंबरठा ओलांडता आला असता. तो का ओलांडला गेला नाही? आता गोदावरीच्या पुलाखालून संमेलनाचे पाणी वाहून गेले आहे, पण काठावर उरलेले हे प्रश्न मात्र कायमच आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta shafi pathan ground report on marathi sahitya sammelan zws