नंदुरबार : राज्यात आतापर्यत एक लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा आकडा असून दोन दिवसात वस्तूनिष्ठ पंचनामे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण नुकसानीची माहिती मिळेल. नुकसानग्रस्त शेतकरी हा मदतीपासून वंचि राहणार नाही, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. सत्तार यांनी बुधवारी नंदुरबार जिल्ह्यातील गारपीटग्रस्त ठाणेपाडा आणि आष्टे भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी संवाद साधला. या भागात कांदा , गहू, बाजरी, पपई, टरबूज यांचे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. सहा महिन्यात या सरकारने १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. गरज पडल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) निकषापेक्षाही जास्तीची मदत देण्याचा सरकारचा मानस आहे. याबाबत दोन दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात घोषणा करतील, असे यावेळी सत्तार यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद सदस्य राम रघुवंशी, देवमन पवार यांच्यासह पदाधिकारी,अधिकारी उपस्थित होते. हेही वाचा >>> नाशिक : अंधारातच अब्दुल सत्तार बांधावर; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन यावेळी पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांच्याविषयी विचारणा केली असता सत्तार यांनी संजय राऊत कधी खरे बोलतात का, जे आमच्या मतावर निवडून गेले ते आमच्यावर बोलणार, असे प्रश्न उपस्थित करुन राऊत यांच्यात हिंमत्त असेल तर दादा भुसेंचे आव्हान स्विकारुन खासदारकीचा राजीनामा देत परत निवडून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. ते परत निवडून आल्यास त्यांचे सरकार भविष्यात नक्कीच येईल. परंतु, निवडून न आल्यास त्यांचे नातूदेखील सरकारमध्ये निवडून येणार नाही, असा टोला सत्तार यांनी लगावला.