low voter registration in nashik graduate constituency zws 70 | Loksatta

नाशिक ‘पदवीधर’मध्ये कमी मतदारनोंदणी; कमी कालावधी मिळाल्याची राजकीय पक्षांची तक्रार

नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. तांबे यांची मुदत फेब्रुवारीमध्ये संपत आहे. लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

नाशिक ‘पदवीधर’मध्ये कमी मतदारनोंदणी; कमी कालावधी मिळाल्याची राजकीय पक्षांची तक्रार
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta file photo

मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

नगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्यातच गतवेळच्या तुलनेत यंदा मतदार नोंदणी कमी झाली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर केली असून, भाजपमध्ये उमेदवारीचा अद्यापही घोळ कायम आहे.

नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. तांबे यांची मुदत फेब्रुवारीमध्ये संपत आहे. लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. पूर्वी या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. मात्र आता काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. तांबे यांनी सन २०१० मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसह गेल्या तीन निवडणुकांतून या मतदारसंघात विजय मिळवला आहे. यंदा भाजपकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे आणि धुळय़ातील शिक्षण संस्थाचालक धनराज विसपुते यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही.

भाजप परिवारातीलच संघटना असलेली शिक्षक परिषद यंदा काहीशी बंडाच्या पवित्र्यात आहे. शिक्षक मतदारसंघात भाजपने परिषदेच्या उमेदवाराला पािठबा द्यायचा आणि पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला परिषदेने सहकार्य करायचे असा सामंजस्याचा करार पूर्वीपासून चालू होता. मात्र गेल्यावेळी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात याला भाजपकडून तडा दिला गेल्याचा आरोप होत आहे. त्यातूनच नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शिक्षक परिषदेने दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनही उमेदवारी जाहीर होणे लांबली गेल्याची चर्चा होत आहे.

नगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात समावेश होतो. सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी एकूण २ लाख ५६ हजार २९५ मतदारांची नोंदणी झाली होती. यंदा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत १ लाख ५५ हजार ३२० मतदारांची नोंदणी झाली आहे. येत्या ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. आयोगाने यंदापासून ऑनलाइन मतदान नोंदणी परवानगी दिली. मात्र त्यामध्ये नोंदणी अपात्र ठरण्याचे प्रमाण मोठे आहे. नगर जिल्ह्यातून १९ हजार ३३९ ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. मात्र ६३९१ नोंदणी अपात्र ठरली आहे. हेच प्रमाण ऑफलाइन नोंदणीमध्ये २१२५ आहे. ३१ ऑक्टोबर २०१९ नंतरची पदवी, अस्पष्ट कॉपी, पत्ता अपूर्ण अशी ऑनलाइन मतदार नोंदणीतील अपात्रतेची प्रमुख कारणे आहेत. आयोगाने प्रथमच अपात्र ठरण्याची कारणेही जाहीर केली आहेत. मतदार नोंदणीची दावे हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे ९ डिसेंबपर्यंत नोंदणीचा दुसरा टप्पा असेल. त्यामध्ये राजकीय पक्षांना नोंदणी वाढवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागणार आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यातून मतदार नोंदणी खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. गेल्यावेळी ९६ हजार १३६ झाली होती. ती यंदा केवळ ३० हजार ६६ झाली आहे तर नगरमधून गेल्यावेळी ८५ हजार ५६५ झाली होती. ती यंदा केवळ ६९ हजार ८३४ झाली आहे. जळगाव, धुळे जिल्ह्यातून हीच परिस्थिती आहे. केवळ नंदुरबारमधून दोन हजारावर नोंदणी वाढली आहे.

प्रारूप यादीतील मतदारसंख्या

(कंसात २०१७ मधील नोंदणी)

नगर : ६९८३४ (८५५६५)

नाशिक :       ३००६६ (९६१३६)

जळगाव :      २४२११ (३४४४२)

धुळे :   १४६३२ (२५४२२)

नंदुरबार :      १६५७७ (१४९६०)

एकूण:  १५५३२० (२५६२५५)

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी मोठा कालावधी दिला होता. यंदा कालावधी कमी झाला. उशिराने नोंदणीस सुरुवात झाली. त्यामध्ये पुन्हा दसरा, दिवाळी सुट्टीचा कालावधी आला होता. मतदार नोंदणीची प्रक्रिया काहीशी क्लिष्ट झाली आहे. काही अटी लागू करण्यात आल्या. तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडून अडचणी निर्माण केल्या गेल्या. परंतु आता दुसऱ्या टप्प्यात नोंदणी वाढेल अशी अपेक्षा आहे. -डॉ. सुधीर तांबे, आमदार

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 06:26 IST
Next Story
लसीकरण होऊनही लम्पीच्या प्रादुर्भावाचे सावट; नाशिक जिल्ह्यात ९९ टक्के लसीकरण पूर्ण