जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे सेवांचा अधिकाधिक लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळक टर्मिनस –बल्लारशाह एक्स्प्रेसला संतनगरी शेगाव स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे भुसावळहून शेगावसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस –बल्लारशाह एक्स्प्रेसला थांबा देण्यात आल्याने शेगाव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. या अतिरिक्त थांब्यामुळे शेगाव स्थानकाचे महत्त्व वाढण्यासोबतच प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होणार असल्याचे मानले जात आहे. भुसावळ मंडळ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २२११० बल्लारशाह–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला ०६ मेपासून शेगाव स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. ही गाडी शेगाव स्थानकावर रात्री ०७.४९ वाजता पोहोचेल. आणि ०७.५० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. तसेच गाडी क्रमांक २२१०९ लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्स्प्रेसलाही शेगाव स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही सुविधा १२ मेपासून सुरू होणाऱ्या प्रवासासाठी लागू करण्यात आली असून, १३ मेपासून सदर गाडी शेगाव स्थानकावर सकाळी ०६.०२ वाजता आगमन करेल. आणि ०६.०३ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. सकाळच्या वेळेत उपलब्ध झालेल्या या थांब्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर वेळेत प्रवास करता येणार आहे.

शेगाव हे विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. संत श्री गजानन महाराजांच्या समाधी स्थळामुळे येथे दरवर्षी लाखो भाविक देशभरातून दर्शनासाठी येत असतात. रेल्वे ही या भाविकांसाठी सर्वात सोयीस्कर आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था असल्याने शेगाव स्थानकावर अधिकाधिक गाड्यांचे थांबे देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून हा अतिरिक्त थांबा मंजूर केला आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, हा थांबा सध्या प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आला आहे. या कालावधीत प्रवाशांचा प्रतिसाद, तिकीट आरक्षणाची संख्या, स्थानकावरील प्रवासी चढ-उतार तसेच एकूण प्रवासी वाहतुकीचा आढावा घेतला जाणार आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास हा थांबा कायमस्वरूपी करण्याबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक निर्णय घेऊ शकते.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत प्रवाशांच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अतिरिक्त थांबे, गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा, स्थानकांवरील मूलभूत सुविधा वाढविणे, स्वच्छता, सुरक्षा तसेच डिजिटल माहिती प्रणाली मजबूत करणे यावर रेल्वे प्रशासन विशेष भर देत आहे. प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रेल्वे विभागाने अलीकडील काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. तसेच एनटीईएस मोबाईल ॲपच्या माध्यमातून गाड्यांचे आगमन, प्रस्थान, थांबे आणि लाईव्ह रनिंग स्टेटसची माहिती सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.