नाशिक – शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पालकमंत्री आणि पोलीस अधिकारी पक्षपाती भूमिका घेतात. त्यामुळे अनेक प्रकरणात आरोपींना पकडले जात नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या संविधान रथाला पोलिसांनी परवानगी नाकारली. संविधान दिन साजरा करण्यास परवानगी न देणाऱ्या पोलीस आयुक्तांना दिवसाढवळय़ा होणारे खून, गुन्हेगारी घटना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाटत नाही. सर्व दिवस सारखे नसतात, असे नमूद करीत त्यांनी एकप्रकारे पोलीस आयुक्तांना इशारा दिला.

भाजपच्या सातपूर मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांचा खून  झाल्यानंतर यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर भंडारी यांनी आक्षेप नोंदविला. या प्रकरणातील संशयित राष्ट्रवादीशी संबंधित आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. मागील काही दिवसांत नाशिकमध्ये दिवसाढवळय़ा खून झाले. महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्यासह अन्य गुन्हेगारी घटना वाढत आहेत. अनेक प्रकरणात कायदेशीर कारवाई झाली नाही. जनतेचे प्रश्न न सोडविता गुन्हेगारांना आश्रय देण्याचे काम सत्ताधारी मंडळी करीत असल्याचा आरोपही भंडारी यांनी केला.

पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस आयुक्त काम करतात. सत्ताधारी अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. अंतिम सत्ता जनतेची असते. पोलीस अधिकाऱ्यांची बांधिलकी पालकमंत्र्यांशी नव्हे तर जनतेशी असायला हवी. त्यामुळे जागरुक रहाण्याचा सल्ला त्यांनी दिला.

दोन वर्षांत मंत्रालयात पाऊल न टाकलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राने प्रथमच पाहिला. माजी गृहमंत्री तुरुंगात असून  माजी पोलीस आयुक्त फरार असल्याचे सरकार सांगते. कुठलीही कामे होत नसल्याने जनतेत प्रचंड असंतोष आहे. तो वेगवेगळय़ा पध्दतीने बाहेर येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत अनेक घोळ घातले गेले. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीची औपचारिकता पूर्ण केलेली नाही. थकीत वेतन सुध्दा दिले नसल्याने एसटी कर्मचारी सरकारवर विश्वास ठेवायला तयार नसल्याचे भंडारी यांनी सांगितले.

संमेलन आयोजकांना टोला

मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींच्या मांदियाळीवरून भंडारी यांनी आयोजकांना टोला लगावला. संमेलनाचे आयोजक नेहमीच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापासून राजकारण बाजुला ठेवण्याची भाषा करतात. पण, त्यांचे बोलणे, करणे वेगळे असते. आयोजकात फार मोठय़ा मंडळींचा समावेश आहे. ते वस्तुस्थिती बाजुला ठेवतात की राजकारण करतात  हे त्यांना अधिक चांगले माहिती आहे, असे नमूद करीत भंडारी यांनी महामंडळ आणि आयोजकांना लक्ष्य केले.