नाशिक – महावितरणच्या राज्यभर पसरलेल्या जाळ्यात सर्वाधिक महत्वाची भूमिका ही अधिकाऱ्यांपेक्षाही कर्मचाऱ्यांची असते. तेच खऱ्या अर्थाने जनमित्र असतात. महावितरणच्या कामगिरीत महत्वाचा वाटा असणाऱ्या जनमित्रांच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे या जनमित्रांच्या सुरक्षेसाठी महावितरणच्या वतीने लवकरच एक पाऊल उचलण्यात येणार आहे. त्यामुळे जनमित्रांच्या सुरक्षा साधनांमध्ये अजून एका साधनाची भर पडणार आहे. नाशिक येथील कार्यक्रमात महावितरणचे (मानव संसाधन) संचालक राजेंद्र पवार यांनी ही माहिती दिली.

महावितरणचे राज्यभरात आर्थिक, भौतिक व तांत्रिक मोठे जाळे पसरलेले असले तरी, कर्मचारी हीच महावितरणची खरी अमूल्य संपत्ती असून, त्यांची सुरक्षा ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे विद्युत क्षेत्रात काम करताना नेहमीच जनमित्रांनी सुरक्षा साधने वापरलीच पाहिजेत, असे आवाहन महावितरणचे (मानव संसाधन) संचालक राजेंद्र पवार यांनी नाशिकरोड येथील महापारेषणच्या सभागृहात महावितरणच्या जनमित्रांसाठी आयोजित विद्युत सुरक्षा साहित्य वाटप कार्यक्रमात केले. प्रारंभी संचालक राजेंद्र पवार यांनी उपस्थितांना विद्युत सुरक्षेची शपथ दिली. “महावितरणमधील काम हे अत्यंत जोखमीचे आहे.

काम करताना झालेली एक छोटीशी चूकसुद्धा जिवावर बेतू शकते. त्यामुळे प्रत्येक क्षणी सतर्क राहणे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सुरक्षेबाबतची जागरूकता निरंतर टिकून राहण्यासाठी नियमितपणे सुरक्षा शपथ घेणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरात आवश्यक ती सर्व आधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जात असून, लवकरच शॉकप्रूफ बूट प्रदान करण्यात येतील.” असे राजेंद्र पवार यांनी सांगितले.

कार्यक्रमात कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे म्हणाले की, “कामाच्या ठिकाणी निष्कारण केलेली घाई अपघाताला आमंत्रण देते. कर्मचाऱ्यांनी स्वतः सुरक्षा साधनांचा वापर करण्याची सवय लावून घ्यावीच, शिवाय आपल्या सहकाऱ्यांनाही त्यासाठी नेहमी आग्रही राहण्याचे आवाहन करावे.”, असे त्यांनी सांगितले. सुरक्षा साहित्य वाटप सोहळ्यापूर्वी संचालक राजेंद्र पवार यांनी नाशिक परिमंडळ कार्यालयात मानव संसाधन विभागाची सविस्तर आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

व्यासपीठावर कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता सुंदर लटपटे, मुख्य महाव्यवस्थापक पवनकुमार कछोट आणि भूषण कुलकर्णी, अधीक्षक अभियंते अनिल थोरात व मोहन काळोगे उपस्थित होते. तंत्रज्ञ महेश कदम व योगिता पेठे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन समीर वडजे यांनी केले. आभार अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांनी मानले.