कौतिकराव ठाले पाटील यांची टीका; आयोजकांवर व्यावसायिकतेचा ठपका
नाशिक : राजकीय रोष पत्करून उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोकवर्गणी आणि लोकसहभागातून निर्माण झालेला आदर्श नाशिकच्या संमेलनात मोडीत निघाला. संमेलनाचे निमंत्रक दिलेल्या शब्दांना जागले नाहीत. त्यातील काही पक्के व्यावसायिक तर, काही हिशेबी निघाले. त्यांनी आपली गणिते मांडून हिशेब केले. भपक्याच्या मोहात पडले. लोकांना दूर लोटले. पंचतारांकित संमेलनाच्या नादात महामंडळाच्या हेतुचा आणि धोरणाचा बळी दिला, अशा कठोर शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिक येथील संमेलनाच्या आयोजकांवर ताशेरे ओढले आहेत.
महामंडळाच्या अक्षरयात्रातील अध्यक्षीय मनोगतात ठाले पाटील यांनी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील विविध मुद्यांवर बोट ठेवले. राजसत्तेच्या मनाविरुध्द सांस्कृतिक सत्तेला आपली आचारसंहिता पाळता आली नाही. या आचारसंहितेचा राजसत्ता आणि तिचे हस्तक सहज चोळामोळा करू शकतात. याचा वस्तुपाठ नाशिकच्या संमेलनाने सांस्कृतिक सत्तेला मिळाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. संमेलन शहरापासून २० किलोमीटर अंतरावर नेल्याने सामान्य रसिक संमेलनापासून वंचित राहिले. त्यामुळे हे संमेलन एकटय़ा छगन भुजबळ यांचे झाले. त्याचा फटका संमेलनातील कार्यक्रमांसह पुस्तक विक्रीला बसला. महामंडळाच्या दृष्टीने संमेलन घेणाऱ्यांची हौस झाली. त्यांनी साहित्य संमेलनाचा उत्सव अगदी झोकात साजरा केला, असा चिमटाही त्यांनी काढला.
संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनास न आल्यामुळे जे नुकसान झाले, त्याबद्दल स्वागत मंडळाचे पदाधिकारी खंतावलेले होते. संमेलनाध्यक्ष येणार नाही हे कुणी आपणास कळविले नाही. उद्घाटनाच्या दिवशी ते येणार नसल्याचे सांगण्यात आले. संमेलनाध्यक्षांची निवड केल्यावर आणि ती निवडलेल्या अध्यक्ष आणि स्वागत मंडळाला कळविल्यानंतर महामंडळाच्या हातातील हुकमी पाने सुटलेली असतात. त्यानंतर साहित्य संमेलनाचा कोण, कसा खेळ करतो हे पाहत राहण्यापलीकडे महामंडळाच्या हाती काही नसते. डॉ. नारळीकर यांनी महामंडळ आणि स्वागत मंडळाची मोठी कोंडी करण्यात कुठलीही कसर सोडली नाही, असे ठाले पाटील यांनी म्हटले आहे. निमंत्रक संस्थेची कार्यपध्दती, राजकीय नेत्यांचा अधिक्षेप यावर ताशेरे ओढणाऱ्या ठाले पाटील यांनी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांचे कौतुक केले. यजमान म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका स्पृहणीय आणि आगामी स्वागताध्यक्षांनी अनुकरण करावी, अशी होती. बाल मेळाव्याला स्वागत मंडळाने मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त रूप व आकार दिला. मराठी वाचकांचा संकोच होत असणाऱ्या काळात नवे वाचक तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी घेतलेल्या बाल मेळाव्याने दिशा दाखविल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केले आहे.
आयोजकांच्या हेतूवर शंका
खरोखरच संमेलन घ्यायचे की संमेलनाच्या आडून आपले घोडे पुढे दामटायचे, यावर संमेलनाचे स्वरूप घडत किंवा बिघडत असते. नाशिकला घोडे दामटलेले लोकांनी पाहिले. सावानाच्या न्यायालयीन वादाचे कारण देऊन लोकहितवादी मंडळाकडून महामंडळास निमंत्रण दिले गेले. संमेलन व्यासपीठावर राजकीय नेत्यांचा वावर नसावा हे स्पष्ट करण्यात आले होते. तेव्हा स्वागताध्यक्षापुरती केवळ एका नेत्याची मुभा द्यावी, अन्य कोणत्याही नेत्याला व्यासपीठाचा वापर करू दिला जाणार नसल्याचे आश्वासन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिले होते. मात्र, ते शब्दाला जागले नाहीत. आमची फसवणूक झाली हे जेव्हा लक्षात आले, तोपर्यंत फार उशीर झाल्याची कबुली ठाले पाटील यांनी दिली आहे.
शासकीय निधी संकलनाचे धोके
नाशिकच्या संमेलनाने निधी संकलनाची नवी पध्दत उदयास आणली. त्यासाठी आता लोकात जाऊन निधी संकलन आणि त्यांना सहभागी करण्याची गरजच नाही. एखाद्या मंत्र्याला वा सत्तेतील वजनदार नेत्याला फक्त स्वागताध्यक्ष बहाल केले की, साहित्य संमेलन तथा राजकीय नेत्यांचे संमेलन झोकात साजरे झालेच म्हणून समजा, असा टोला त्यांनी लगावला. आमदार, खासदारांकडून पत्र घेऊन शासकीय तिजोरीतून विनासायास दीड-दोन कोटी रुपये जमा होतात. आमदारांच्या खिशाला झळ नाही. संमेलन घेणाऱ्याला दगदग करावी लागत नाही. कालांतराने सरकारच साहित्य संमेलन ताब्यात घेईल. साहित्य संस्था आणि वाडमयीन जगताने हा धोका लवकर ओळखावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
