जळगाव : मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसच्या एका डब्यातील शौचालयात अज्ञात व्यक्तीने काळ्या खडूच्या सहाय्याने रेल्वेत बॉम्ब ठेवला आहे. पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद, असे लिहिले होते. हा मजकूर पाहताच प्रवाशांनी तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर जळगावसह भुसावळ स्थानकांवर बुधवारी सुरक्षा यंत्रणांनी कडक तपासणी केली.

काळ्या खडूच्या सहाय्याने शौचालयात लिहिलेला संदेश प्रवाशांनी वाचला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी. आर. मीना यांनी तातडीने पाऊले उचलत सर्वसाधारण तसेच आरक्षित डब्यांमधील प्रवाशांची चौकशी केली. त्यानंतर सदरचा प्रकार हा कोणाचा तरी खोडसाळपणाचा असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून नंतर जळगावसह भुसावळ रेल्वे स्थानकावर संपूर्ण गाडीची कसून तपासणी केली गेली. तसेच प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले.

महानगरी एक्सप्रेस जळगाव स्थानकावर नेहमीप्रमाणे बुधवारी दाखल होताच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलीस (जीआरपी) यांनी संयुक्त मोहीम सुरू केली. श्वानपथक तसेच बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्कॉड (बीडीएस) पाचारण करून प्रत्येक डब्याची काटेकोर तपासणी करण्यात आली. प्रवाशांच्या सामानाचीही कसून झडती घेण्यात आली. घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकरच सामान्य झाली. तरी देखील सर्व रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात ठेवण्यात आले, तपास पूर्ण होईपर्यंत हाय अलर्ट कायम राहिला. दरम्यान, महानगरी एक्सप्रेसमध्ये लिहिलेला बॉम्ब ठेवल्याचा व पाकिस्तान झिंदाबाद आणि आयएसआय, असा मजकूर कोणीतरी नंतर अर्धवट पुसून टाकला होता. हा प्रकार जाणीवपूर्वक केला असावा की त्यामागे काही मोठा कट आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

घडलेला प्रकार कोणाचा तरी खोडसाडपणा असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे, असे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर. मीना यांनी सांगितले. सुरक्षा यंत्रणांनी गाडीतील प्रत्येक डबा, आसन, लगेज रॅक आणि शौचालय तपासून पाहिले. जवळपास तासभर चाललेल्या तपासणीनंतर महानगरी एक्सप्रेसमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक साहित्य आढळले नाही. त्यानंतर एक्स्प्रेसला पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आल्याची माहिती मीना यांनी माध्यमांना दिली.