मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर तालुक्यातील ईशान्येश्वर मंदिरात भविष्य पाहिल्याची चर्चा सुरु असताना ईशान्येश्वर मंदिरातील संबधीत व्यक्ती अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहत नसल्यास तसा फलक त्यांनी मंदिरात लावावा तसेच जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून तसे हमीपत्र लिहून द्यावे, अन्यथा अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द करावे, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आधारतीर्थ आश्रमातील बालक मृत्यू प्रकरण : संशयित बालकाच्या उत्तरांनी पोलीसही स्तंभित

मुख्यमंत्री शिंदे यांनी ईशान्येश्वर मंदिरात पूजा करतानाच भविष्य पाहिल्याची चर्चा रंगल्यानंतर ईशान्येश्वर संस्थानने मंदिरात कुंडली पाहिली जात नाही किंवा हातही पाहिला जात नाही, असे जाहीर केले. त्यांचा हा दावा मान्य असल्याचे अंनिसने म्हटले आहे. मंदिरातील संबधित व्यक्ती अंकशास्त्राचा अभ्यासक आहे. संबधित अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहत असल्याचा अंनिसचा दावा आहे. संबंधिताने अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द केल्यास अंनिस जनतेतून मिळविलेले २१ लाख रुपये त्यांना बक्षीस देईल, असे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या कथित भविष्य पाहणीवरून वाद; बेजबाबदारपणाची कृती: अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीका

मुख्यमंत्र्यांनी रुद्र पूजा करण्यास अंनिसचा विरोध नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकास श्रद्धा आणि उपासनेचा आधिकार दिला आहे. परंतु, संबधित व्यक्तीची ख्याती पहाता ही पूजा भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी केलेला तोडगा असावा, असा संशय अंनिसने व्यक्त केला आहे. त्याचे कारण ही पूजा आमावास्येला केली गेली. इतकेच नव्हे तर, ही पूजा करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी शिर्डीच्या नावाखाली दौरा आयोजित केला की काय, अशी शंका उपस्थित होते. मुंबईच्या महत्त्वाच्या बैठका रद्द करून आणि गोपनीयता राखत शिष्टाचार दूर सारत हा दौरा झाला. मुख्यमंत्र्यांना रुद्र पूजा करायची होती तर मुंबईला अथवा कुठेही करु शकत होते. मात्र ईशान्येश्वर मंदिरात केली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे संबधित लोकांशी मैत्री होण्याचे गुपित उघड करावे, असे आव्हानही चांदगुडे यांनी दिले आहे. शिक्षणमंत्र्यांची ही कृती विद्यार्थ्यांना चुकीचा संदेश देणारी असून पुरोगामी महाराष्ट्राला मागे नेणारी असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री दादा भुसे यांनी पूजेला अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे असल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्र अंनिस सर्वांच्या श्रद्धा आणि उपासनेचा आदर करीत असताना कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या ज्योतिषाला विरोध करीत आहे. ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. ती स्वप्न विकण्याची कला आहे. जनतेने अशा लोकांपासून दूर रहावे, अंधानुकरण करू नये, असे आवाहन चांदगुडे यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra andhashraddha nirmoolan samiti astrology predictions by numbers zws
First published on: 25-11-2022 at 20:50 IST