नाशिक – कोणत्याही कामापेक्षा शासकीय सेवेतील कामाचे सर्वांनाच आकर्षण असते. शासकीय नोकरी म्हणजे एकप्रकारची निश्चिंतता असे बहुसंख्यांचे मत असते. शासकीय सेवेची ओढ आणि लहान मुलांना शिकविण्याची आवड असलेल्या महिलांसाठी नोकरीची सधी उपलब्ध झाली आहे. शासनाच्या तळागाळातील सर्वच कामांमध्ये ज्यांचा मोठ्या प्रमाणावर वाटा असतो, किंबहुना अशी कामे ज्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत, अशी व्यक्ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस.
राज्यातील अंगणवाड्यांमध्ये १, ०९५ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या ३, ९२८ अशा एकूण ४, ९४३ जागांवर भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया आधीच सुरु झाली असून या सेवेसाठी इच्छुक असलेल्यांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. म्हणजेच इच्छुकांच्या हातात अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे त्यांनी त्वरेने हालचाल करण्याची गरज आहे.
महिला आणि बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार आहे. अंगणवाडी आणि मदतनीस या पदांचे महत्व अलिकडील काळात खूपच वाढले आहे. ग्रामीण भागात तर प्रत्येक लहानसहान कामांसाठी अंगणवाडी सेविकांवर अवलंबून राहावे लागत आहे. अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्यासाठी महिलेची शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण अथवा समकक्ष असणे आवश्यक आहे.
अर्जदारांचे वय १८ ते ३५ वर्षे यादरम्यान असाावे. इच्छुक महिला जर विधवा असेल तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारास शासनाच्या नियमानुसार मानधन दिले जाईल. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना १३ हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना ७५०० रुपये महिना वेतन दिले जाणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील इच्छुक महिलांना अर्ज करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे.
भरतीसाठी अर्ज केल्यावर १०० गुणांच्या निकषांवर उमेदवारांची निवड केली जाईल. त्यात शैक्षणिक आणि अतिरिक्त अशा गुणांचा विचार केला जाईल. त्यानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कमाल ८० गुण आहेत. त्यात बारावी, पदवी, पदव्युत्तर डी. एड. बी. एड. एम.एस्सी, आयटी किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्रांच्या गुणांच्या आधारे ८० गुण दिले जातील. याशिवाय अतिरिक्त गुण २० आहेत. त्यात विधवा, अनाथ महिलांसाठी १० गुण, अनुसूचित जाती, जमातींसाठी ५ गुण, इतर मागासवर्गीय आणि इतर प्रवर्गांसाठी ३ गुण आणि अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदाचा दोन वर्षांचा अनुभव असल्यास ५ गुण राखीव ठेवण्यात आले आहेत.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोन्ही पदांसाठी ३१ जुलै ही ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदेत आहे. त्यानंतर ३ ते ७ ऑगस्ट या कालावधीत अर्जांची छाननी आणि प्राथमिक यादी जाहीर होईल. १० ते १२ ऑगस्ट या कालावधीत गुणवत्ता यादीची पडताळणी. १३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि आक्षेप नोंदविण्याची सुविधा. इतके झाल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी अंतिम निवड जाहीर होईल. पात्र महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तिचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येतआहे.
