जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात गुरुवारी मार्च महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर शुक्रवारी अनेक महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे आणखी १५०० रुपये जमा झाल्याचे संदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सलग दोन दिवसांत महिलांच्या खात्यात ३००० रुपये वर्ग करण्यात आले आहेत. आता लाभार्थी महिलांचे लक्ष मे महिन्याच्या हप्त्याकडे लागले असून, पुढील रक्कम कधी जमा होणार याची उत्सुकता वाढली आहे.
गेल्या दोन दिवसांत तब्बल ३००० रुपये जमा झाल्याने लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सुमारे २ कोटी ४७ लाख महिलांनी नोंदणी केली. मात्र त्यानंतर अर्जांची पडताळणी, कागदपत्रांची तपासणी आणि विविध निकषांच्या छाननीनंतर लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता २४ मार्च रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या हप्त्यांसाठी महिलांना प्रतीक्षा करावी लागली.
अखेर शासनाने १४ आणि १५ मे रोजी अनुक्रमे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात दोन दिवसांत एकूण ३००० रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, योजनेतील लाभार्थ्यांची फेरतपासणी सुरू असताना मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी समोर आले. शासनाने ई-केवायसी, उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी तसेच इतर निकषांच्या आधारे तपासणी मोहीम राबवली.
या प्रक्रियेत काही महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे उघड झाले, तर काही सरकारी सेवेत असलेल्या व्यक्तींनीही नियमबाह्य पद्धतीने अनुदान घेतल्याचे आढळून आले. काही कुटुंबांचे उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही स्पष्ट झाले. विशेष म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेतल्याची धक्कादायक प्रकरणेही समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर, शासनाने कठोर भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची फेरतपासणी केली.
मार्चअखेरपर्यंत सुमारे ६८ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले होते. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर एप्रिल महिन्यात अनेक महिलांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केली. सुमारे १४ लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण करून आपली पात्रता सिद्ध केली. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होऊन आता ती सुमारे ५४ लाखांवर आल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्यात सुमारे १ कोटी ८९ लाख पात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
