नाशिक -राज्यातील ३७ एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील (ईएमआरएस) ३०९३ जागांसाठी रविवारी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. ४६ केंद्रांवर होणाऱ्या परीक्षेसाठी १६ हजार ४२ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. इयत्ता सहावीसाठी सकाळी ११ ते दुपारी एक तर इयत्ता सातवी ते नववीसाठी सकाळी ११ ते दुपारी दोन यावेळेत परीक्षा होणार आहे.

राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) मार्फत एकलव्य मॉडेल निवासी शाळेत (सीबीएसई संलग्न) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इयत्ता सहावीच्या २,२२० तर इयत्ता सातवी ते नववीच्या ८७३ अशा ३०९३ जागांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. सहावीसाठी विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश हे पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर इयत्ता सातवी ते नववीसाठी विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर गुणानुक्रमे प्रवेश मिळणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेसाठी नाशिक अपर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून सर्वाधिक ७,३५३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

 नागपूर विभागातून ३८८७, अमरावती विभागातून ३०७४, तर ठाणे विभागातून १७२८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या परीक्षेसाठी नाशिक विभागात १८, नागपूर विभागात ११, अमरावती विभागात सात तर ठाणे विभागात १० केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी अपर आयुक्त कार्यालयस्तरावरून सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे.

एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील उपलब्ध जागांचा विचार करता त्यापेक्षा पाचपटहून अधिक अर्ज प्राप्त  झाले  आहेत. नाशिक विभागात ११९२ जागांसाठी सर्वाधिक (७३५३ अर्ज) प्राप्त झाले आहेत. तर नागपूर विभागात ९२३ जागांसाठी (३८८७ अर्ज), ठाणे विभागात ५८३ जागांसाठी (१७२८ अर्ज) आणि अमरावती विभागात ३९५ जागांसाठी ३०७४ अर्ज प्राप्त झाले  आहेत. दरम्यान, राज्यात महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीने नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल  स्टुडंट्सच्या मार्गदर्शनाखाली चार विभागात ३७ शाळा सुरू केल्या आहेत.

 प्रत्येक इएमआरएस शाळा सर्व आवश्यक पायाभूत सुविधांनी  सुसज्ज आहे. इएमआरएस स्कूल महाराष्ट्राचे विद्यार्थी शैक्षणिक, क्रीडा  आणि अभ्यासक्रमआणि सहअभ्यासक्रम उपक्रमांच्या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवत आहेत. केवळ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळा आहेत, इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या या शाळा सीबीएसई दिल्लीशी संलग्न आहेत. शाळांमध्ये सहावी ते बारावीचे वर्ग आहेत आणि अकरावी आणि बारावीसाठी विज्ञान शाखेचा समावेश आहे. पाचवीच्या प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड सहावीसाठी केली जाते. ज्यामध्ये आश्रम शाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा आणि इतर कोणत्याही शाळांमधील विद्यार्थी बसू शकतात असे सोसायटीने म्हटले आहे.