जळगाव : शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत चौथी यादी जाहीर झाली आहे. या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यावर ४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा लाभ जमा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पात्र कर्जांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची तरतूद आहे.

थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड

योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने करण्यासाठी ऑनलाइन संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. राज्यातील विविध बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीकडून या माहितीचे संगणकीय पद्धतीने परीक्षण आणि संस्करण करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत चार याद्यांमधून एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जात आहे.

आतापर्यंत १८ हजार ४० कोटींचा लाभ

योजनेच्या अंमलबजावणीत आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी यापूर्वी १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांमध्ये १३ हजार २७५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आता चौथ्या यादीतील आणखी ४.८७ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात येत आहेत. या टप्प्यातील वितरणामुळे योजनेअंतर्गत आजअखेर लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २०.७२ लाखांवर पोहोचणार आहे. तर एकूण कर्जमुक्तीची रक्कम १८ हजार ४० कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.

जळगावच्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार

राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असताना जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ९७६ शेतकऱ्यांना मिळणारा ४५.७० कोटी रुपयांचा लाभ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीमुळे पुढील शेती हंगामाचे नियोजन करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष आता कर्जमुक्तीची रक्कम प्रत्यक्ष कर्जखात्यात जमा होण्याकडे लागले आहे.