जळगाव : राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट)’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अत्यल्प खर्चात घरांच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती संच बसविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असताना, लाभार्थी वीज ग्राहकांच्या मोबाईलवर सुमारे ३० हजार रुपये सौरऊर्जा अनुदान मंजूर झाल्याचे मॅसेज येऊ लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.

राज्यातील गरीब, निम्न उत्पन्न गट आणि कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांना ऊर्जा स्वावलंबनाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील सुमारे पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यात दारिद्र्यरेषेखालील १ लाख ५४ हजार ग्राहक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ३ लाख ४५ हजार ग्राहकांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. महावितरणमार्फत सुरू करण्यात आलेली ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेशी ही योजना संलग्न करण्यात आल्याने लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या दुहेरी अनुदानाचा फायदा मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यासोबत राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील वीज ग्राहकांना केंद्र सरकारचे ३० हजार आणि राज्य सरकारचे १७ हजार ५०० रुपये, असे एकूण ४७ हजार ५०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. परिणामी, या लाभार्थ्यांना केवळ २५०० रुपये भरून सौरऊर्जा संच बसविता येणार आहे. तसेच, महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सर्वसाधारण ग्राहकांना राज्य सरकारकडून १० हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. या लाभार्थ्यांना स्वतःच्या हिस्स्याचे सुमारे १० हजार रुपये तेवढे भरावे लागतील.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील ग्राहकांसाठी राज्य सरकारकडून १५ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या गटातील लाभार्थ्यांना फक्त ५ हजार रुपयांत सौरऊर्जा संच उपलब्ध होणार आहे.

योजनेसाठी निवड झालेल्या अनेक ग्राहकांना सौरऊर्जा संच बसविण्यापूर्वीच भ्रमणध्वनीवर अनुदान मंजूर झाल्याचे संदेश प्राप्त होऊ लागले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना सुखद धक्का बसत असून योजनेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणच्या माहितीनुसार, एक किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा संचातून दरमहा साधारण १२० युनिट वीज निर्मिती होऊ शकते. त्यामुळे १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबांची संपूर्ण गरज या प्रकल्पातून भागू शकते. याशिवाय अतिरिक्त निर्मिती होणारी वीज महावितरणला विकण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे नागरिकांचे वीजबिल शून्यावर येण्याबरोबरच अतिरिक्त उत्पन्नाचाही मार्ग खुला होणार आहे.

वाढत्या महागाईच्या काळात ही योजना सर्वसामान्य कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. सौरऊर्जा प्रकल्पाची कार्यक्षमता सुमारे २५ वर्षे टिकत असल्याने एकदाच अल्प गुंतवणूक करून दीर्घकाळ मोफत वीज वापरण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.