नाशिक – प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. आंदोलनाची पुढील दिशा आता नाशिक आणि मुंबईकडे कूच राहणार आहे. जिल्हाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव पायी २४ जानेवारीपर्यंत नाशिक येथे दाखल होणार आहेत. नाशिक येथे मुक्कामानंतर ते मुंबईकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी दिली.
अखिल भारतीय किसान सभा आणि माकप यांच्या वतीने जिल्ह्यात तालुकानिहाय आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाचा प्रभाव आदिवासी तालुक्यांमध्ये अधिक्याने दिसून आला. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर हे तीन तालुके टंचाईगस्त आहेत. या भागातील पश्चिमवाहिनी नद्या आणि उपनद्यांवर मोठ्या आकाराचे बंधारे बांधून त्यांचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीला द्यावे, वनपट्टेधारकांचे क्षेत्र ४० आरपेक्षा कमी असल्याने शासकीय योजनांचे लाभ घेता येत नाहीत. त्यामुळे कब्जे वहिवाटीतील चार हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राची मोजणी करून भूखंड मंजूर करावा, त्याचा सातबारा तयार करावा, अपात्र वनदाव्यांची फेरचौकशी करून दावे पात्र करणे, वनपट्टेधारकांच्या कृषिमालाची हमीभावाने खरेदी करणे आदी मागण्यांकडे आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले.
किसान सभेचा आदिवासी तालुक्यांमध्ये प्रभाव आहे. या भागात शेकडो आदिवासी बांधव आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना जोडणारे नाशिक-पेठ आणि नाशिक-वणीमार्गेे सापुतारा या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीवर आंदोलनाचा परिणाम झाला. नाशिक-पेठ रस्त्यावरील रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, याबाबत माजी आमदार जे. पी. गावीत यांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा झाली. मागण्या राज्य सरकारशी संबंधित असल्याने थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गावित यांनी सांगितले.
वन जमिनी, नदीजोड प्रकल्प यासह काही विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने आता मुंबई गाठणार आहे. बुधवारी कळवण येथून निघालेले आदिवासी बांधव रात्री नांदुरी येथे मुक्कामी थांबले. सुरगाणा येथून निघालेले पाढांणे परिसरात मुक्कामास आहेत. हे सर्वजण २४ जानेवारी रोजी नाशिक येथे पोहचतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील, असे गावित यांनी स्पष्ट केले. आंदोलकांनी आपल्याबरोबर मुक्कामी राहण्याचे सामान, शिदोरी घेतली आहे. साधारणत: सात ते आठ हजार लोकांचा जमाव नाशिकच्या दिशेने येत असल्याची माहिती गावित यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वरसह इतर आदिवासी तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा आणि माकप यांच्या वतीने नाशिकपर्यंत मोर्चा काढण्यात येत आहे. नाशिकनंतर मोर्चेकरी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.
