मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. शिंदे यांच्याकडे  ४५ आमदार आहेत. शिवाय, अठरापैकी १२  खासदारही आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कितीही प्रयत्न केले, कोणतेही अर्ज भरून दिले, तर मला वाटत नाही की त्यांच्या बाजूने निकाल लागेल, असे मत ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

जामनेर येथे जी. एम. फाउंडेशनतर्फे दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते स्वरसंध्या महोत्सव-२०२२ हा भव्य संगीतमय कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान मंत्री महाजन यांची मुलाखतही गुप्ते यांनी घेतली, त्यावेळी त्यांनी आपला राजकीय जीवनप्रवासही उलगडून दाखवीत विरोधकांवर जोरदार टोलेबाजीही केली. त्यांनी राजकीय जीवनप्रवासाचा पट उलगडून दाखविला. शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक, भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ता, भाजपमध्ये कार्यकर्ता यांपासून ते १९९२ मध्ये सरपंचपदी निवड झाल्यापासून सहाव्यांदा आमदार ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास उलगडला.

हेही वाचा >>> ‘मदत सोडा, मुख्यमंत्री भेटायला पण आले नाहीत’, ग्रामस्थांचं आदित्य ठाकरेंकडे गाऱ्हाणं, उत्तर देत म्हणाले “गद्दारांनी खोके स्वतःला…”

१९९५ मध्ये प्रमोद महाजन यांनी मला तिकीट दिलं. तुला आमदारकीला उभं राहायचं आहे, त्यावेळी ईश्‍वरलाल (बाबूजी) जैन हे माजी आमदार होते, ते राजेच होते. ते माझ्याविरोधात होते. मी प्रमोद महाजन यांना म्हटलं, ते हत्तीवरून साखर वाटताहेत, माझ्या खिशात पाच-दहा हजार रुपयेसुद्धा नाहीत, मी कसा काय लढणार, त्यांनी सांगितलं, वर्गणी जमा कर, पैसे माग आणि निवडणूक लढ. मी पहिल्यांदा निवडणूक लढलो १९९५ मध्ये. पहिल्यांदा निवडून आलो. दुसर्‍यांदाही आमचे बाबूजी खूप चिडले होते, माझे चांगले संबंधही त्यांच्याशी आहेत. त्यांनी सांगितलं, तू आता कसा निवडून येतो बघतोच, मी दुसर्‍यांदा पुन्हा निवडून आलो. दोनदा निवडून आलो, त्यांनी सांगितलं, तू सडकछाप माणूस आहे, टपरीछाप आहे, तू कुठेही बसतो, कुठेही सह्या करतो, मला ते जमणार नाही. म्हणून तू लोकप्रिय झाला आणि खरं होतं. मी टपरीवर बसून पत्र लिहायचो. हातगाडीवर उभं राहून पत्र लिहीत असायचो. रस्त्यात लोकांना भेटत असायचो. पहिली पाच-दहा वर्षे माझ्याजवळ कार्यालय नव्हतं आणि मी लोकाभिमुख झालो. त्यानंतर तिसर्‍यांदा पुन्हा निवडणूक लढलो, त्यावेळी बाबूजी माझ्यासमोर नव्हते. तिसर्‍यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा आणि विशेष आहे. मी पहिल्यांदा बारा हजार मतांनी निवडून आलो. नंतर सोळा हजारांनी आलो, तिसर्‍यांदा मी एकोणीस हजारांनी आलो, चौथ्यांदा मी तेवीस हजारांनी आलो, चौथ्यादा मी चोवीस हजारांनी आलो, पाचव्यांदा मी अठ्ठावीस हजारांनी आलो आणि सहाव्यांदा मी चाळीस हजार मतांनी निवडून आलो. त्याबरोबर माझी पत्नी साधना हीदेखील माझ्या आधी जिल्हा परिषद सदस्य झाली. १९९१ मध्ये जामनेर जिल्हा परिषदेची जागा राखीव झाली, त्यावेळी ग्रामपंचायत होती, मग हिला तिकीट दिलं. ती सहा वेळा निवडून आलेली आहे.

हेही वाचा >>> दिवाळीनिमित्त सप्तशृंगी गडावरील मंदिर आजपासून भाविकांसाठी २४ तास खुले

त्या काळात प्रचारासाठी कार्यकर्ते शेव-मुरमुरे घेऊन जात होते. आता काळ बदलला आहे. आता कार्यकर्त्यांना एसी गाड्या लागतात, ढाबे, हॉटेल लागतात. आता खूप गमतीजमती आहेत, मी सुरुवातीपासून एकाच पक्षामध्ये आहे, सुरुवातीपासून एकच झेंडा हाती घेतला आहे, तो म्हणजे हिंदुत्वाचा झेंडा, भाजपचा झेंडा. जामनेरमध्ये नगरपालिका आहे. २९ सदस्य आहेत. ते सर्वच्या सर्व भाजपचे आहेत. त्यात आठ मुस्लीम सदस्य आहेत. हे आठच्या आठ सदस्य कमळ चिन्हावर निवडून येतात, असेही मंत्री महाजन म्हणाले.

पत्नी साधना महाजन यादेखील माझ्यापेक्षा अधिक मतदारसंघात फिरताते. प्रत्येक सुख-दुखाच्या कार्यक्रमात ती सहभागी असते. म्हणून मला महाराष्ट्रभर फिरायला वेळ मिळतो. मी घरी महिनाभर नसतो. निवडणुकीवेळी चार महिने मी मतदारसंघात पाय ठेवला नव्हता. छगन झाल्टे, शिवाजी सोनार, गोविंदा अग्रवाल हे स्वतः गाडीमध्ये सोबत घेऊन रोज फिरत असतात. कुणालाही माझी कमी भासू देत नाहीत, एवढं नक्की. त्यामुळे मला महाराष्ट्रभर फिरणं खूप सोयीचं जातं, असेही त्यांनी सांगितले. सध्या भाजपचं पुन्हा सरकार प्रस्थापित झालेय, हे काही सर्व घडलं, त्याच्या पाठीमागं गिरीश महाजनांचा फार मोठा हात आहे, असं म्हटलं जातंय, तेही मुंबईमध्ये या प्रश्‍नावर मंत्री महाजन म्हणाले की, मी खारीचा वाटा उचलत असतो, आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं मी संकटमोचक. खरंय गेल्या पाच वर्षांच्या काळामध्ये जलसंपदा व वैद्यकीय खात्याचा मंत्री होतो, ही महत्त्वाची खाती माझ्याकडे होती, यावेळीही तीन खाती माझ्याकडे आहेत. कुठलाही मोर्चा असेल, कुठलंही संकट असेल, तर निश्‍चित तर मी सामोरं जायचो. देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर विश्‍वास आहे, पक्षाचा विश्‍वास आहे. त्यामुळे काहीही झालं तर बघून घे, हे निश्‍चित असायचं आणि मी समर्थपणे या सर्व गोष्टी हाताळत होतो. आता सरकार बदललं, मला आनंद आहे, सर्व महाराष्ट्राला आहे, हे निश्‍चित. त्यांनी कामाच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या बळावर, सेवेच्या बळावर आम्ही निवडून येतो. जामनेर शहर सुंदर आहे. आता जामनेर शहर महाराष्ट्रात एक नंबर करायचंय. क्रीडा क्षेत्रात मला काम करायचंय. त्यासंदर्भात मी अंबानींनाही भेटलो. त्यांच्याशी माझे जवळचे संबंध आहेत. त्यांनी सीसीआरमधून पैसे घ्या, शंभर कोटी घ्या, पन्नास कोटी घ्या, असे सांगितले. वर्षभरामध्ये आपल्या जामनेर शहरामध्ये एक उत्कृष्ट असं क्रीडा संकुल तयार करणार आहे, ते माझं स्वप्न आहे, असे महाजन यांनी सांगितले.