नाशिक – नेपाळमध्ये महापुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत महाराष्ट्रातील ८० हून अधिक पर्यटक, भाविक अडकल्याचा प्राथमिक अंदाज असून, आतापर्यंत त्यातील चार जणांशी संपर्क झाला आहे. इतरांशी अद्याप संपर्क झालेला नाही. कैलास मानस सरोवर यात्रेसाठी राज्यातील काही पर्यटक गेले असून, त्यांची संख्या स्पष्ट झालेली नाही. यातील जळगावच्या एका कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थापन केलेल्या मदत कक्षात पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या नागरिकांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातून नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. राज्यातील पर्यटक दोन बसमधून तेथे गेले आहेत. या बस रिचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या आहेत. ४५ जणांचे दोन गट आहेत. यातील चार जणांशी संपर्क झाला असून, इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत.

माझ्या घराशेजारील एक कुटुंबही नेपाळमार्गे कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेले आहे. त्यांच्याशी संपर्क झाला असून, ते सुखरूप असल्याची माहिती मिळाली, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. त्यांच्यासोबत राज्यासह अन्य राज्यांतील ३७ पर्यटक, भाविक आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश, दक्षिण भारत आणि मुंबईतील पर्यटकांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील किती जण आहेत, याची स्पष्टता झालेली नाही. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातून नेपाळ, कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांची माहिती संकलित करण्यास सांगितले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संकेतस्थळ कार्यरत आहे. विभागाचे अधिकारी २४ तास सतर्क असून, ते नेपाळमधील पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

पर्यटकांची माहिती देण्याचे आवाहन

नेपाळमध्ये पूल, गावे, जलविद्युत प्रकल्प वाहून गेले असून, पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. भूस्खलनामुळे तेथील नेटवर्क यंत्रणा कोलमडली आहे. प्रशासनाचा चार जणांशी संपर्क झाला असून, त्यांच्या माध्यमातून अनेक पर्यटक सुरक्षित असल्याचे कळाले आहे. नागरिक किंवा नातेवाईकांकडे या भागात गेलेल्या पर्यटकांची माहिती असल्यास त्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा शासकीय पोर्टलवर द्यावी. २४ तास नियंत्रण कक्ष आणि संकेतस्थळ सुरू असून, राज्य सरकार केंद्र सरकार आणि नेपाळ प्रशासनाच्या सतत संपर्कात असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.