नाशिक – राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील महसूल विभागातील असंतोष उफाळून आला आहे. विधीमंडळात कुठलीही चौकशी न करता महसूलमंत्री अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एकतर्फी निलंबन करतात. महसूल विभागाला तणावाखाली काम करावे लागते. यामुळे पुणे विभागातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात आता राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी शुक्रवारपासून उतरणार आहेत.
जिल्ह्यातील महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी(तलाठी )आणि मंडळाधिकारी यांनी सोमवारी बेमुदत संप सुरु केलेला असतांनाच आता तहसीलदार,नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी संवर्गातील वर्ग एकचे अधिकारीही आता काम बंद आंदोलनात उतरणार आहेत. या बाबतची नोटीस बुधवारी नाशिक जिल्हा महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिली.
महसूल विभाग राज्याच्या प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. विभागावर शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी व जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अमलबजावणीची जबाबदारी आहे. सामान्य जनतेशी संबंधित कामे व समस्यांसंदर्भात कार्यरत असल्याने सामान्यांमध्ये या विभागाविषयी आपुलकी व आदराची भावना आहे. तथापि, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातर्फे विधीमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या होणाऱ्या एकतर्फी निलंबनाच्या घोषणेमुळे आणि सामान्यांसमक्ष दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे तणावाखाली काम करावे लागत असल्याची भावना असल्याकडे महासंघाने लक्ष वेधले.
अलीकडेच विधीमंडळ अधिवेशनात महसूल मंत्री बावनकुळे यांनी कोणत्याही चौकशी समितीचा अहवाल नसताना, कुणी मागणी केलेली नसताना किंवा संबंधितांचे म्हणणे ऐकून न घेता चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी व दोन ग्राम महसूल अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा केली. तसेच भंडारा येथील तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांचे निलंबन व तत्कालीन तहसिलदारांबाबत फौजदारी कारवाई करण्याचे सभागृहात जाहीर केल्याचे दाखले महसूल महासंघाकडून दिले जात आहे.
या घटनाक्रमामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत असल्याने पुणे महसूल विभागातील अदिकारी यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यास पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे महसूल अधिकारी व कर्मचारी महासंघाने म्हटले आहे.
