नाशिक : राज्यातील पाण्याचे असमान वितरण दूर करण्यासाठी ज्या नदी खोऱ्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी उपलब्ध होते, ते पाणी धरणे, कालवे, बोगदे आणि अन्य माध्यमांतून पाण्याची कमतरता असलेल्या नदी खोऱ्यांकडे वळविण्याच्या नदी जोड योजनांना राज्य सरकारने गती दिली आहे. समुद्राकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील दुष्काळी भागांकडे वळविणे हा या नियोजनाचा मुख्य उद्देश आहे. या योजनांसाठी टप्प्याटप्प्याने सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार आहेत.

याबाबतची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातील सहा नदी खोऱ्यांचा अभ्यास करून एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पाणी विपुल असलेल्या खोऱ्यांतील अतिरिक्त जलसाठा पाण्याची गरज असलेल्या भागाकडे नेण्याचे नियोजन आहे. या प्रक्रियेत केवळ सिंचनच नव्हे, तर पिण्याचे आणि औद्योगिक पाणी उपलब्ध करून देण्यावरही भर आहे.

प्रस्तावित प्रकल्पांमुळे सुमारे आठ जिल्ह्यांना पाणी मिळून १० लाख एकरांहून अधिक जमीन सिंचनाखाली येण्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. या सर्व योजनांसाठी पुढील एक-दोन महिन्यांत सुमारे २५-२५ हजार कोटी रुपयांच्या टप्प्यांत निविदा काढण्याचे नियोजन आहे. दरम्यान, सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले असून, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात

नदी वळण योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे उपलब्ध पाण्याचा भौगोलिक असमतोल कमी करणे. पश्चिमेकडील तसेच पाण्याची उपलब्धता तुलनेने अधिक असलेल्या खोऱ्यांमधील अतिरिक्त पाणी दुष्काळी पट्ट्याकडे आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील पाण्याची कमतरता असलेल्या भागांना दीर्घकालीन जलस्रोत मिळण्याची अपेक्षा आहे. विदर्भात पूर्वेकडील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन ते पश्चिमेकडील अकोला, अमरावती, बुलढाणा आदी भागांकडे वळविण्याचे नियोजन आहे. या भागात सिंचनाचा विस्तार झाल्यास शेतीबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यालाही लाभ

उत्तर महाराष्ट्रातील नार-पार नदी जोड प्रकल्पाला या व्यापक आराखड्यात महत्त्व आहे. नाशिक, मालेगाव, चाळीसगाव, जळगाव आणि पाचोरा परिसराला त्याचा लाभ मिळण्याचे नियोजन आहे. नार-पार प्रकल्पातील सुमारे ५,५०० कोटी रुपयांचे एक टेंडर काढण्यात आले असून, आणखी सुमारे सात हजार कोटी रुपयांच्या कामाची निविदा लवकरच काढली जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. याशिवाय दमणगंगेतील समुद्राकडे जाणारे सुमारे सात टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त भागांना अतिरिक्त जलस्रोत मिळण्याची शक्यता आहे.