नाशिक – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेत नाशिक विभाग राज्यात पाचव्या स्थानावर राहिला. विभागाचा निकाल ९०.५३ टक्के लागला. मागील वर्षाच्या तुलनेत २.५१ टक्क्यांनी घसरण झाली. यावर्षीही मुलींनी मुलांपेक्षा जोमदार कामगिरी केली. विभागात नंदुरबार जिल्हा (९३.७१ ) अग्रस्थानी तर जळगावचा निकाल सर्वात कमी (८५.२५ ) लागला. नाशिकचा (९२.६६) आणि धुळे जिल्ह्याचा निकाल ९२.०५ टक्के लागला.

एकूण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक आहे. विभागात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चारही जिल्ह्यातून दोन लाख एक हजार ९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एक लाख ८१ हजार १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऑनलाईन निकालानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लवकरच अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज नऊ ते २३ मे या कालावधीत करता येतील. गुण पडताळणीसाठी प्रतिविषय ५० रुपये शुल्क आहे.

पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय ३०० रुपये शुल्क आहे. जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले जातील. दरम्यान, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेतून गुणपत्रक आणि प्रमाणपत्र कधी मिळणार, याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे मंडळातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सलग दोन वर्ष घसरण

नाशिक विभागाच्या निकालात सलग दोन वर्ष घसरण झाली आहे. मार्च २०२४ मध्ये विभागाचा निकाल ९५.२८ टक्के होता. मार्च २०२५ मध्ये घसरण होऊन ९३.०४ टक्के निकाल लागला. यावर्षी त्यात २.५१ टक्के कमी झाले.

श्रेणीनिहाय विद्यार्थी

नाशिक विभागात ६४ हजार सात विद्यार्थी ७५ टक्क्यांहून अधिक म्हणजे प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर ६० टक्क्यांहून अधिक प्रथम श्रेणीत २९ हजार ५०९, द्वितीय श्रेणीत २५ हजार ७५६ (४५ टक्क्यांहून अधिक) आणि उत्तीर्ण अर्थात ३५ टक्क्यांहुन अधिक १० हजार २१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

समुपदेशकांद्वारे मार्गदर्शन

निकालानंतरचे नकारात्मक विचार वा दडपण दूर करण्यासाठी मंडळाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समूपदेशन करण्यासाठी ऑनलाईन समूपदेशन सेवा कार्यान्वित केली आहे. यासाठी १० समूपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आठ दिवस विद्यार्थी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत संबंधितांशी संपर्क साधू शकतील. समूपदेशकांशी ९९६०६ ४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४० ८४५९३, ९३५९९ ७८३१५, ८१६९२०२२११४, ७२० ८४२९३८१, ७७०९१५६०६८९४०४७८३९९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.