नाशिक – जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे आयोजित ३५ वर्षे आणि त्यावरील विविध नऊ वयोगटाच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत यजमान नाशिक, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, पुणे, ठाणेच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली.

नाशिकचे चंदन जाधव, प्रणव सवाई-सुजय आघारकर, प्रशांत दुधेंडिया-सौरभ गाडगीळ, निश्म्रिता प्रभू-वर्षा थोरात यांनी उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेत तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी ३५ वर्षे, ४० वर्षे, ४५ वर्षे आणि ५० वर्षे या विविध गटांचे सामने खेळविले गेले. नाशिकच्या गंगापूर रोडजवळील केन्सिंगटन क्लब येथे ही स्पर्धा सुरु आहे. पुरुषांच्या ४० वर्षे वयोगटामध्ये नाशिकचे दुसरे मानांकन असलेले चंदन जाधव याने नागपूरच्या बाळकृष्ण भावे याचा २१-१६ आणि २१- १३ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ३५ वर्षे गटाच्या दुहेरी प्रकारात नाशिकच्या प्रणव सवाई-सुजय आघारकर आणि मुंबईच्या सागर पाटील-सोमनाथ सोनावणे यांच्यातील उपउपांत्य लढत फारच चुरशीची झाली.

नाशिकच्या जोडीने एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखत पहिल्या सेटमध्ये आघाडी घेत हा सेट २१-१३ असा जिंकून १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र मुंबईच्या जोडीने संयमाने खेळ करत सेट २१-१६ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये १०-१० अशी बरोबरी होती, त्यानंतर मात्र नाशिकच्या प्रणव -सुजय जोडीने उत्कृष्ट खेळ करीत सेट २१-१७ असा जिंकून सामनाही जिंकत उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले.

पुरुषांच्या ४० वर्षे गटात दुहेरी प्रकारात नाशिकच्या प्रशांत दुधेंडिया-सौरभ गाडगीळ आणि मुंबई उपनगरच्या मितेश अरोरा-विकास शेट्टी जोडीचा सामना २-२ अशा बरोबरीत असतांना मुंबईचा खेळाडू जखमी झाल्यामुळे या सामन्यात नाशिकच्या जोडीला उपांत्य फेरीसाठी चाल मिळाली.

पुरुषांच्या ३५ वर्षे गटात एकेरीमध्ये निनाद कामत (कोल्हापूर), ओंकार पालकर ( (सातारा), सोमनाथ सोनावणे आणि जसविंदर सिंग (दोघेही मुंबई शहर) यांनी उपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या ४० वर्षे गटात एकेरीत नाशिकचा चंदन जाधव, निगेल दास (ठाणे), निखिल कोल्हटकर (ठाणे), दीपक जैत (मुंबई) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या ४५ वर्षे गटामध्ये एकेरीत जयेंद्र ढोले (नागपूर), विनीत (पुणे), कौशिक वर्तक (मुंबई), धीरेंद्र मौर्य (मुंबई) आणि विनित दाबक (पुणे) यांनी उपांत्य फेरी गाठली.

महिलांच्या ३५ वर्षे गटात एकेरी प्रकारात मुंबईच्या पल्लवी मित्तल आणि वरदा दीक्षित यांनी तसेच ४० वर्षे गटात मुंबईच्या पूजा झालाणी, फरहा त्रेहान, सौमी बोस आणि रम्या वेंकट यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. ४५ वर्षे गटामध्ये मुंबईच्या सोनल भट्टड, प्रिया आंबेकर आणि पूजा श्रीराम यांनी आणि नागपूरच्या ज्योती वानखेडेने उपांत्य फेरीत प्रवेश केला.