नाशिक – प्रो कबड्डी लीग स्पर्धेमुळे कबड्डीची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे घरोघरी प्रो कबड्डी लीगमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडुंची नावे माहीत झाली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील नाशिकचा आकाश शिंदे (बेंगळुरू बुल्स), पुण्याचे अजित चव्हाण (यु मुंबा) आणि तेजस पाटील (हरियाणा स्टीलर्स), अहमदनगरचा आदित्य शिंदे (पुणेरी पलटण) आणि कोल्हापूरचा दादासाहेब पुजारी (पुणेरी पलटण) यांसारख्या स्टार कबड्डीपटूंचा खेळ पाहण्याची संधी नाशिक जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींना मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ आणि क्रीडा शौकिनांच्या गळ्यातील ताईत असलेल्या वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा (शिवचषक) बिगुल वाजला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील ‘नमो क्रीडा नगरी’ (आडवा पट्टा) येथे २ ते ६ एप्रिल या कालावधीत ७३ वी पुरुष व महिला गट स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना, नाशिक जिल्हा कबड्डी संघटना आणि सह्याद्री युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सलग तिसऱ्या वर्षी जागतिक स्तरावर ‘एक्सक्लुझिव्ह’ थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क ‘स्पोर्टवोट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मने पटकावले आहेत. यामुळे जगभरातील कबड्डी प्रेमींना घरबसल्या या हाय-व्होल्टेज स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.
यावेळच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रो-कबड्डी लीगमध्ये आपल्या खेळाची छाप पाडणाऱ्या दिग्गज खेळाडूंची मांदियाळी. नाशिकचा आकाश शिंदे (बेंगळुरू बुल्स), पुण्याचे अजित चव्हाण (यु मुंबा) व तेजस पाटील (हरियाणा स्टीलर्स), अहमदनगरचा आदित्य शिंदे (पुणेरी पलटण) आणि कोल्हापूरचा दादासाहेब पुजारी (पुणेरी पलटण) यांसारखे स्टार खेळाडू आपापल्या जिल्हा संघांचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. त्यांच्या सहभागामुळे स्पर्धेतील चुरस आणि तांत्रिक दर्जा कमालीचा उंचावणार आहे.
राज्य अजिंक्यपद स्पर्धा हा भारतीय कबड्डीचा कणा आहे. ग्रामीण भागातील कच्च्या हिऱ्यांना आणि अनुभवी प्रो-खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणून त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, हा मुख्य उद्देश आहे, असे ‘स्पोर्टवोट’चे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धांत अगरवाल यांनी या भागीदारीबद्दल सांगितले. ” राज्य कबड्डी असोसिएशनच्या प्रवक्त्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करताना नमूद केले की, गेल्या तीन वर्षांपासून स्पोर्टवोटबरोबर असलेल्या या प्रवासामुळे कबड्डी खेळाचा प्रसार तळागाळातील चाहत्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत झाली आहे”, असे त्यांनी सांगितले. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अनुभवाची शिदोरी असलेले प्रो-खेळाडू आणि जिद्दीने खेळणारे नवोदित खेळाडू यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळेल. हे सर्व सामने ‘स्पोर्टवोट’ अॅपवर थेट पाहता येतील.
