जळगाव : भारतीय कापूस संघटना अर्थात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटक, या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजात वाढ केली आहे. त्यानुसार, ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या हंगामासाठी कापूस उत्पादनाचा अंदाज ७.५० लाख गाठींनी वाढवून ३१७ लाख गाठींवर नेण्यात आला आहे.

भारतीय कापूस संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कापसाच्या उत्पादनात सुमारे तीन लाख गाठींची वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर तेलंगणा राज्यात कापूस उत्पादनात ४.५० लाख गाठींची, तर कर्नाटकात १ लाख गाठींची संभाव्य वाढ नोंदवण्यात आली आहे. तिन्ही राज्यांतील अनुकूल हवामान, लागवडीखालील क्षेत्रातील स्थैर्य आणि पीक व्यवस्थापनामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे सीएआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. २०२४-२५ च्या हंगामात देशातील एकूण कापूस उत्पादन ३१२.४० लाख गाठी होते. त्याच्या तुलनेत चालू २०२५-२६ च्या हंगामात कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी, ३० सप्टेंबर २०२६ रोजी हंगामाच्या अखेरीस देशातील कापसाचा एकूण पुरवठा ४२७.५९ लाख गाठींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. हा आकडा मागील वर्षीच्या ३९२.५९ लाख गाठींच्या एकूण पुरवठ्यापेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे.

कापूस निर्यात घटण्याचा अंदाज

सीएआयच्या माहितीनुसार, २०२५-२६ च्या हंगामात एकूण कापूस पुरवठ्यात हंगामाच्या सुरुवातीला उपलब्ध असलेला ६०.५९ लाख गाठींचा साठा तसेच हंगामात होणारे ३१७ लाख गाठींचे अंदाजित उत्पादन आणि सुमारे ५० लाख गाठींच्या आयातीचा समावेश आहे. कापसाच्या उपलब्धतेत वाढ झाल्याने देशातील कापूस उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, २०२५-२६ हंगामात भारतात कापसाच्या आयातीचा अंदाज सीएआयने ५० लाख गाठींवर कायम ठेवला आहे. मात्र, निर्यातीच्या बाबतीत घट अपेक्षित असून, मागील हंगामातील १८ लाख गाठींच्या तुलनेत यंदा निर्यात सुमारे तीन लाख गाठींनी कमी होण्याचा अंदाज आहे. जागतिक बाजारातील मागणीत झालेला बदल आणि देशांतर्गत वापराला प्राधान्य यामुळे निर्यातीवर परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या कापसाला किती दर ?

देशांतर्गत वापराच्या बाबतीत, २०२५-२६ या वर्षात कापसाचा एकूण वापर ३०५ लाख गाठींपर्यंत (एक गाठ १७० किलो) राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा आकडा मागील कापूस हंगामातील ३१४ लाख गाठींच्या वापराच्या तुलनेत कमी आहे. वस्त्रोद्योगाच्या मागणीतील मर्यादा, यंत्रमाग आणि सूत गिरण्यांवरील खर्चाचा ताण, यामुळे कापसाच्या वापरात घट झाल्याचे चित्र आहे. एकूणच, कापूस उत्पादन आणि पुरवठ्यात वाढ होत असली तरी मागणी व निर्यातीतील घट ही बाब आगामी काळात कापूस बाजारासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र सीएआयच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. त्याचा मोठा परिणाम कापूस दरवाढीवर आगामी काळात होण्याची चिन्हे आहेत. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत कच्च्या कापसाला हमीभावापेक्षा थोडे जास्त म्हणजे ८२०० ते ८५०० रूपयांपर्यंत दर मिळत आहेत.