मालेगाव : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदाच्या १७ जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. त्यात औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नाशिक गटातील दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. हा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
या-ना-त्या कारणाने आदिवासी विकास महामंडळ संचालकांची पंचवार्षिक निवडणूक लांबल्याने गेल्यावेळी पाच वर्षासाठी निवडून दिलेल्या संचालकांनी तब्बल १७ वर्षे कारभार बघितला. एवढ्या अवधीनंतर झालेल्या या निवडणुकीत त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाल्याचे बघावयास मिळाले. मातब्बर उमेदवार व नेत्यांची प्रतिष्ठा त्यामुळे पणास लागली होती. महामंडळाच्या नाशिक जिल्ह्यातील दोन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते व दोन पॅनेल्स एकमेकांच्या विरोधात उभे होते.
औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व माजी आमदार जीवा पांडू गावित यांचे चिरंजीव इंद्रजित गावित हे त्यात विजयी झाले आहेत. १६३ पैकी झिरवाळ यांना सर्वाधिक १०७ तर गावित यांना ८९ मते मिळाली. विरोधी पॅनलचे माजी आमदार शिवराम झोले व विलास गवळी यांना मात्र या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे.
शुक्रवारी महाराष्ट्रातील १६ वेगवेगळ्या केंद्रांवर हे मतदान झाले होते. रविवारी सकाळी ९ वाजता नाशिक येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य इमारतीत मतमोजणी सुरू झाली. या निवडणुकीसाठी राज्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी याप्रमाणे एकूण ८२४ मतदार होते. नाशिक जिल्ह्यातील संचालकांच्या दोन जागांसाठी सर्व १६३ संस्थांच्या प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला होता.
या निवडणुकीत विजयी झालेले अन्य उमेदवार व त्यांचा मतदार संघ पुढील प्रमाणे : सुनील भुसारा व दिलीप पटेकर (पालघर व ठाणे), देवमन पवार व तानाजी वळवी (नंदुरबार,धुळे व जळगाव), अशोक मंगाम (यवतमाळ व नांदेड), भरतसिंग दूधनाग व रमेश ताराम (नागपूर,भंडारा वर्धा व गोंदिया), मंगेश धाडसे (चंद्रपूर), गोपाल उईके, सैनु गोटा व यशवंत चौरीकर (गडचिरोली), शितल मडावी व मीनाक्षी वटी (महिला राखीव). पुणे रायगड व अहिल्यानगर मतदार संघातील वैभव पिचड तसेच अमरावती मतदार संघातील केवलराम काळे हे अविरोध निवडून आले आहेत. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, संभाजी निकम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघितले.
सर्वाधिक मतदार नाशिकचे…
या महामंडळ निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील मतदारांची संख्या सर्वाधिक १६३ होती. अन्य जिल्ह्यातील मतदारांची संख्या अशी : धुळे ३६, जळगाव ६, नंदुरबार ९७, अहिल्यानगर ३८, अमरावती ३३, यवतमाळ १७, नागपूर १३, वर्धा २, चंद्रपूर ६३, गडचिरोली १२०, गोंदिया ३९, पुणे २६,ठाणे ३२, रायगड १९, पालघर ८७ व नांदेड २४. आदिवासी विकास मंत्री हे या महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर, याच खात्याचे राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात. या महामंडळाचे भाग भांडवल जवळपास दोन हजार कोटी आहे.
