नाशिक – येथील महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीमार्फत राज्यातील ३७ एकलव्य निवासी शाळांमध्ये (सीबीएसई संलग्न) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी एक मार्च रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा होणार आहे. परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला १५ डिसेंबरपासून सुरूवात झाली असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांनी दिली आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सीबीएसई मंडळाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीमार्फत एकलव्य निवासी शाळा चालविल्या जातात. या शाळांमधील इयत्ता सहावीच्या दोन हजार २२० जागांवर पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार असून यात एक हजार १०० मुली तर एक हजार १०० मुलांच्या जागा आहेत. इयत्ता सातवी ते नववीच्या ८७३ रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश दिला जाणार आहे. इयत्ता सातवीच्या ४००, आठवीच्या २९० तर नववीच्या १८३ जागा रिक्त असून या जागा पूर्वपरीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. विभागनिहाय नाशिक- ११९३, नागपूर- ९२३, ठाणे- ५३ आणि अमरावती- ३९५ अशा जागा आहेत. अधिक माहितीसाठी http:/tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक एकलव्य निवासी शाळेत इयत्ता सहावीसाठी ३० मुले आणि ३० मुली अशी ६० प्रवेश क्षमता असणार आहे. इयत्ता सातवी, आठवी आणि नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. या सर्व जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. – लीना बनसोड (सदस्य सचिव, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी)

