नाशिक : विद्यापीठ उन्हाळी व हिवाळी सत्रातील वैद्यकीय पदवी (एमबीबीएस), वैद्यकीय पदव्युत्तर पदविका, वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी डिप्लोमा, डीएम, एम.केम) आणि वैद्यकीय पदव्युत्तर या सर्व अभ्यासक्रमातील विद्यापीठाच्या लेखी परीक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड घेण्याविषयी सहमती झाली. उपरोक्त बाब आगामी परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या उन्हाळी आणि हिवाळी सत्रातील वैद्यकीय पदवी तसेच पदव्युत्तर पदविका परीक्षा एक दिवसआड अशा पध्द्तीने वेळापत्रक तयार करुन घेण्यात येतात. परंतु, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार या अभ्यासक्रमाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा एका महिन्याच्या आत घेण्यात याव्यात, असे निर्देशित असल्याने परीक्षा मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चान्वये विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र २०२४ पासून या परीक्षा एक दिवसाची सुट्टी न देता सलग घेण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. हेही वाचा.Maharashtra MLC Polls : नाशिक शिक्षक मतदारसंघात ९० टक्क्यांहून अधिक मतदान याबाबत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करुन निवेदन दिले. त्याअनुषंगाने कुलगुरु कानिटकर यांनी विद्यार्थ्यांशी झुम बैठकीद्वारे संवाद साधला. यादरम्यान एक दिवसआड परीक्षा घेण्याविषयी ऑनलाईन मतदान प्रक्रिया राबवली असता बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा एक दिवस आड परीक्षा घ्यावी, असा दिसून आला. या ऑनलाईन संवादात प्रति-कुलगुरु प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विठ्ठल धडके, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, तसेच संबंधीत विद्यार्थी उपस्थित होते.