नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नाशिक जिल्हा रुग्णालय एकत्रितपणे रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या माध्यमातून ९० हून अधिक प्रशिक्षित डॉक्टर मिळाले असून जिल्हा रुग्णालयावरील कामाचा ताण हलका करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लवकरच सात नवे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरु डॉ. कानिटकर यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्यस्तरावर सहा विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयात नॅक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लवकरच विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र कौशल्य विकासच्या सहकार्याने इनक्युबेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांवर येणाऱ्या ताणाच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठाच्या वतीने मानस आरोग्य ॲप तयार करण्यात आले आहे.
१८ ते ३० वयोगटातील १० हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. विद्यापीठाच्या आवारात पाच हजाराहून अधिक वृक्ष लावण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त या ठिकाणी कान, नाक, जीभ, त्वचा आणि डोळे या पचेंद्रियांवर आधारित संवेदना बगीचा तयार करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सात आदिवासी तालुक्यांमध्ये विद्यापीठाचा नाशिकल हा उपक्रम सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पहिल्या सहा महिन्यातील नवजात शिशु आणि १२ ते १६ वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> मनमाड: अन्न महामंडळाच्या गोदामातून २७ क्विंटल तांदळाची चोरी
सिकलसेलची तपासणी करुन पुढील टप्पात म्हणजे जुलै-ऑगस्ट मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील. विद्यापीठाच्या वतीने उन्हाळी सुट्टीत समर इंटरशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. लवकरच या धर्तीवर डीग्री प्लस उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. कानिटकर यांनी सांगितले. यावेळी प्रतिकुलगुरू डॉ. मिलींद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित होते.