नाशिक: नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून डॉ. व्यंकट गिते यांचा पदग्रहण समारंभ विद्यापीठात उत्साहात झाला. यावेळी कुलगुरु डाॅ. गिते यांनी विद्यापीठासाठी कुलगुरु म्हणून आपण काय काय करणार आहोत, त्यासंदर्भातील मनोगत मांडले. आरोग्य शिक्षणात संशोधनावर आधारित उपक्रम, पारदर्शक प्रशासकीय कामकाज व विद्यार्थी केंद्री कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यासह विद्यापीठात आता सिंगल विन्डो सिस्टम प्रणाली लागू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर कुलगुरु डॉ. व्यंकट गिते समवेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अजित फुंदे, डॉ. श्रीचक्रधर मुंघल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. अनिता गिते आदी उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. व्यकंट गिते यांनी सांगितले की, विद्यापीठात समाजोपयोगी संशोधन होणे गरजेचे आहे त्यासाठी संशोधक विद्यार्थी यांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय मानांकनात पहिल्या शंभर विद्यापीठाच्या यादीत स्थान मिळावे यासाठी विविध संशोधन, समाजोपयोगी आरोग्य जनजागृती उपक्रम व ‘नॅक’ च्या धर्तीवर गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठात सिंगल विन्डो सिस्टम प्रणाली लागू करण्यात येईल ज्याव्दारा विद्यार्थी आपल्या समस्या मांडू शकतील. व्ही.सी. पोर्टल कार्यान्वीत करुन त्याव्दारा ऑनलाईन तक्रारींचा निपटारा करण्यात येईल. कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करण्यात येईल. कॉन्फीडन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशनवर अधिक भर देण्यात येईल.

आय.आय.टी., इस्त्रो, स्पोर्ट इंस्टिटयुट ऑफ सायन्स सारख्या नामांकित संस्थांशी करार करुन आरोग्य शिक्षण प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी भर देण्यात येईल. नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळयासाठी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या मदतीने आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम, आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा, मोटर-सायकल ॲम्ब्युलन्स सर्व्हिस यासारखे उपक्रम राबवून समाजोपयोगी काम करण्यातसाठी विद्यार्थ्यांना प्ररित करण्यात येईल. विद्यापीठाकडून ई-क्लासरुम सुरु केल्यास एकाच वेळी हजारो विद्यार्थी तज्ज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन घेतील, असे कुलगुरु डाॅ. गिते यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरु यांच्या मातोश्री शाहुबाई अर्जुनराव गिते यांचा सन्मान करण्यात आला. कुलगुरु यांच्या पत्नी डॉ. अनिता गिते, बंधू भास्कर गिते यांचा विद्यापीठाकडून सत्कार करण्यात आला. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांना ज्ञानदान करणारे त्यांचे शिक्षक व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पुरुषोत्तम दराख, डॉ. श्रीराम कंडी, डॉ. अनुराधा कंडी, डॉ. जे.एस. कंडी, डॉ. मलीक, डॉ. गौरांग शहा, डॉ. पळनीटकर, डॉ. एन.डी.कुलकर्णी, डॉ. पंकज माहेश्वरी, डॉ. प्रविण कुमार वसाडीकर, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अजय बोराळकर, डॉ. किरण पाटोळे, डॉ. स्वप्नाली कदम, डॉ. गणेश जाधव, डॉ. सचिन देवरे, डॉ. अनिल सानप, डॉ. अशोक थोरात आदी गुरुजनांचा कुलगुरु यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी कुलगुरुंचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. आभार देवेंद्र पाटील यांनी मानले.