आरोग्य विद्यापीठाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा

विहित मुदतीत निकाल जाहीर करता यावेत, यासाठी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर तातडीने विषयनिहाय गुणपत्रिका व उत्तरपत्रिका मोहरबंद लिफाफ्यात प्रतिनिधीमार्फत आरोग्य विद्यापीठास सादर करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेस विलंब करणाऱ्या महाविद्यालयांना दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा आरोग्य विद्यापीठाने दिला आहे.

कोणत्याही परीक्षेचा निकाल ४५ दिवसांच्या आत लावणे विद्यापीठांवर बंधनकारक आहे. त्यासाठी आरोग्य विद्यापीठासह अन्य विद्यापीठांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत विहित मुदतीच्या आतमध्ये निकाल लावण्याकडे प्राधान्यक्रमाने लक्ष दिले आहे. या मुदतीच्या आत सर्व वैद्यक शाखांचे निकाल जाहीर होत असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

या संदर्भात राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना सूचित करण्यात आले. प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर लगेचच संबंधित वर्षांची विषयनिहाय गुणपत्रिका व उत्तरपत्रिका लिफाफ्यात मोहोरबंद करून विद्यापीठास जमा करणे बंधनकारक आहे. जी महाविद्यालये विहित केलेल्या वेळेत प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणपत्रक व उत्तरपत्रिका सादर करणार नाहीत, अशा महाविद्यालयांना दहा हजार रुपये दंड का आकारला जाऊ नये, अशी नोटीस बजावली जाईल. संबंधित महाविद्यालयांकडून खुलासा प्राप्त झाल्यावर ही प्रकरणे निर्णयासाठी कुलगुरूंसमोर सादर केली जातील. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणपत्रक विद्यापीठास प्रतिनिधीमार्फत जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा ठरावात नमूद केल्यानुसार कारवाई होईल, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे.

प्रतिबंधात्मक उपाय योजना

प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणपत्रक-उत्तरपत्रिका विहित मुदतीत महाविद्यालयांनी सादर न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्याचा उद्देश विहित मुदतीत निकाल जाहीर करणे आहे. मुदतीत निकाल लागल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही. सर्व वैद्यक शाखांचे निकाल ३० दिवसांच्या आत लावणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. गुणपत्रक हा संवेदनशील दस्तावेज आहे. टपालाने पाठविताना तो गहाळ झाल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. यामुळे महाविद्यालयांनी प्रतिनिधीमार्फत ते मोहोरबंद लिफाफ्यात विद्यापीठात सादर करण्याचा दंडक आहे. कोणत्याही अडचणी उद्भवू नये म्हणून विद्यापीठ प्रतिबंधात्मक उपाय योजत आहे.

– डॉ. कालिदास चव्हाण (परीक्षा नियंत्रक)

विद्यापीठाचा महाविद्यालयांवर ठपका

निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया मुदतीत होण्याकरीता विद्यापीठाकडे प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणपत्रिका लवकर प्राप्त होणे आवश्यक असते. प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयाने गुणपत्रिकांचे सीलबंद लिफाफे महाविद्यालयाच्या प्रतिनिधीमार्फत विद्यापीठास सादर करणे अनिवार्य आहे. त्यासाठी महाविद्यालयांना विद्यापीठ नियमानुसार तीन वेळेस प्रवास व दैनिक भत्ता दिला जातो. तथापि, काही महाविद्यालये प्रात्यक्षिक परीक्षेचे लिफाफे विलंबाने अथवा टपालाने सादर करतात. यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल विहित वेळेत जाहीर करण्याच्या अनुषंगाने अडचणी उद्भवतात. या विषयावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. तेव्हा घेतलेल्या दंडात्मक कारवाई करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणीची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे.