जळगाव : महावितरणने जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात वेळेवर वीज बिल न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या विरोधात धडक मोहीम सुरू आहे. वारंवार आवाहन करूनही बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या सुमारे चार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू महिन्यात खंडित करण्यात आला आहे. इतर थकबाकीदारांनी बिल न भरल्यास त्यांनाही अंधारात राहावे लागणार आहे.
जळगाव परिमंडलात वीज बिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिमंडलातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात कृषी वर्गवारी वगळता महावितरणची थकबाकी ११२९ कोटी २९ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पैकी जळगाव जिल्ह्यात ५६८ कोटी ६६ लाख, धुळे जिल्ह्यात ३३० कोटी १० लाख आणि नंदुरबार जिल्ह्यात २३० कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहकांनी वीज बिल न भरल्याने महावितरणच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, महावितरणने आता थकबाकीदारांची वीज जोडणी खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, चालू महिन्यात जळगाव जिल्ह्यातील २११०, धुळे जिल्ह्यातील १०८४ आणि नंदुरबार जिल्ह्यातील ५३६ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
कारवाईत अडथळे आणल्यास गुन्हे
थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई पोलीस बंदोबस्तात केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची गुंडगिरी किंवा राजकीय दबावाला बळी न पडता ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार आहे. मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील महावितरणने दिला आहे. ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये आणि त्यांचा वेळ वाचावा, यासाठी महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूपीआय नेट बँकिंग, वॉलेट्स, फोन पे, गुगल पे आणि महावितरणच्या वेबसाइटद्वारे घरबसल्या वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन बिल भरणाऱ्यांना महावितरणकडून भरघोस सूट सुद्धा दिली जाते.
पुनर्जोडणी शुल्काचा भूर्दंड
ग्राहकांनी थकबाकीमुळे वीज जोडणी तोडण्याची वाट न पाहता चालू महिन्याच्या वीज बिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी ३१० रुपये तर थ्री फेज जोडणीसाठी ५२० रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीज बिल भरणे आवश्यक आहे. ग्राहकांनी तातडीने थकीत वीज बिल भरणे गरजेचे आहे. अन्यथा महावितरणचे कर्मचारी कधीही वीजपुरवठा खंडित करू शकतात. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.
