scorecardresearch

नाशिक: वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ७० फूट पोहत जाऊन प्रयत्न; महावितरणच्या कर्मचाऱ्याची कामगिरी

सिन्नर तालुक्यातील वावी आणि पाथरे या गावांना वीज पुरवठा करणाऱ्या उपकेंद्राचा शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून काही तांत्रिक कारणास्तव वीज पुरवठा बंद झाला.

नाशिक: वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ७० फूट पोहत जाऊन प्रयत्न; महावितरणच्या कर्मचाऱ्याची कामगिरी
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ७० फूट पोहत जाऊन प्रयत्न

धकबाकी वसुलीसाठी होणारी सक्ती, वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, यासह इतर कारणांमुळे महावितरणची प्रतिमा डागाळत असताना काही कर्मचाऱ्यांकडून ही प्रतिमा सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न होत असून शेतकऱ्यांना वीज पुरवठा होण्यासाठी एका कर्मचाऱ्याने तलावात ७० फुटाचे अंतर पोहत जाऊन वीज खांबावरील बिघाड दूर केला. सिन्नर तालुक्यातील या वीज कर्मचाऱ्याने केलेल्या प्रयत्नामुळे सहा तास बंद असलेला वीज पुरवठा सुरळीत झाला.

हेही वाचा >>>सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”

सिन्नर तालुक्यातील वावी आणि पाथरे या गावांना वीज पुरवठा करणाऱ्या उपकेंद्राचा शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून काही तांत्रिक कारणास्तव वीज पुरवठा बंद झाला. हा बिघाड शोधण्यासाठी दोन्ही उपकेंद्राचे कक्ष अभियंता अजय सावळे आणि हर्षल मांडगे हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन सिन्नर ते वावी दरम्यान असलेल्या मुख्य वीज वाहिनीची पाहणी करत होते. गोंदे शिवारात असलेल्या पाझर तलावातील वीज खांबावर बिघाड असल्याचे लक्षात आले. याठिकाणी तीनपैकी एका खांबावर काही तांत्रिक बिघाड होता. चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या खांबापर्यंत पोहचायचे कसे, हा प्रश्न होता.समृध्दी महामार्गासाठी या तलावातील मातीचा उपसा केल्याने तलाव २० फूट खोल गेला आहे. तलावातील खांब ते काठ हे अंतर ७० फूट आहे.

हेही वाचा >>>“नितू, निलू आगाऊ लेकरं,” सुषमा अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “नारायण राणेंनी संस्कार…”

खांबापर्यंत पोहचण्यासाठी शिडीही नाही. अशा बिकट परिस्थतीत वावी पाथरे उपकेंद्रात काम करणारे योगेश वाघ पुढे आले. आपणास पोहता येत असल्याने पाण्यातून खांबापर्यंत जातो, असे सांगत अधिकाऱ्यांची परवानगी घेत त्यांनी पाण्यात उडी मारली. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी परवानगी देतांना वाघ यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली. ७० फूटाचे अंतर पार करत वाघ खांबावर सराईतपणे चढले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी दोन वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. वाघ यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 20:06 IST

संबंधित बातम्या