जळगाव : सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यासह रिलीज ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या भुसावळ शहर कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून, सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित अभियंत्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
एसीबीच्या कारवाईत अडकलेल्या संशयिताचे नाव नितीन अभिमन्यू पाटील ( ४९), असे असून ते महावितरणच्या भुसावळ शहर विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीची अधिकृत एजन्सी आहे. या एजन्सीमार्फत भुसावळ शहरातील दोन ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा युनिटची उभारणी करण्यात आली होती. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महावितरणकडून तांत्रिक पडताळणी करून मंजुरी देणे आणि त्यानंतर रिलीज ऑर्डर जारी करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित ग्राहकांना नेट मीटरिंगसह सौर ऊर्जा योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळतो.
यासाठी तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रांसह दोन्ही ग्राहकांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने महावितरणकडे सादर केले होते. या अर्जांची छाननी करून मंजुरी देण्याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे होती. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही अर्जांना मंजुरी मिळत नसल्याने तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला.
पाठपुरावा सुरू असतानाच संबंधित अभियंत्याने दोन्ही प्रकरणांच्या मंजुरीसाठी प्रत्येकी एक हजार रुपये, अशी एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. ही रक्कम दिल्यानंतरच मंजुरी देऊन रिलीज ऑर्डर काढण्यात येईल, असे स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराला लाचेची मागणी मान्य नसल्याने त्यांनी कोणताही अनुचित व्यवहार न करता थेट जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
संपूर्ण प्रकाराची माहिती देत अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच एसीबीने प्राथमिक चौकशी सुरू केली. तक्रारीतील आरोपांची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध सापळा रचला. बुधवारी ठरल्याप्रमाणे तक्रारदार संबंधित अभियंत्याला भेटले.
लाचेची दोन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच परिसरात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने धाड टाकत नितीन पाटील यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त करण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, तसेच कर्मचारी संगिता पवार आणि बाळू मराठे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
