जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडलातील २.२५ लाखांहून अधिक घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट टीओडी मीटर बसविल्यामुळे गेल्या सात महिन्यांत तब्बल १.५ कोटींहून अधिक रकमेची सवलत मिळाली आहे. दिवसा वीज वापरावर देण्यात येणाऱ्या या सवलतीमुळे घरगुती ग्राहकांच्या वीज बिलात मोठी घट झाल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीज दर रचनेत घरगुती ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत वापरलेल्या वि‍जेवर प्रतियुनिट ८० पैसे ते एक रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार एक जुलै २०२५ पासून या सवलतीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे पूर्णपणे मोफत बसविले जात आहेत.

जळगाव परिमंडलात जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत दोन लाख ३३ हजार २०९ घरगुती ग्राहकांना एकूण एक कोटी ६३ लाख ३२ हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. त्यापैकी जळगाव मंडलातील एक लाख ३७ हजार १७७ ग्राहकांना ८९ लाख ९० हजार रुपये, धुळे मंडलातील ५८ हजार ८१४ ग्राहकांना ४० लाख २४ हजार रुपये, तर नंदुरबार मंडलातील ३७ हजार २१८ ग्राहकांना ३३ लाख १८ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.

टीओडी प्रणालीनुसार वीज वापराच्या वेळेनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकांनंतर प्रथमच घरगुती ग्राहकांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे. २०२५-२६ या वर्षात प्रतियुनिट ८० पैसे सवलत देण्यात येत असून, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे, तर २०२९-३० मध्ये प्रतियुनिट १ रुपया सवलत मिळणार आहे. स्मार्ट टीओडी मीटरमुळे वीज वापराचे रीडिंग स्वयंचलित पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे बिलिंगमधील अचूकता वाढली असून, मानवी हस्तक्षेपाला पूर्णविराम मिळाला आहे.

ग्राहकांना त्यांच्या घरातील दर तासाचा वीजवापर मोबाईलवर पाहता येत असल्याने वापरावर नियंत्रण ठेवणेही सोपे झाले आहे. दिवसा वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर यांसारख्या उपकरणांचा वापर नियोजनबद्ध केल्यास अधिक बचत शक्य होत असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले.

अत्याधुनिक स्मार्ट मीटर प्री-पेड नसून पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीज वापरल्यानंतरच बिल आकारले जाणार असून, ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, दिवसा वीज वापरावरील सवलतीचा लाभ घेण्यासाठी घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असणे आवश्यक आहे. दरम्यान, स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला गती देण्यात आली असून, ग्राहकांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.