नाशिक – राज्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांची वीज देयके मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी होत असून, या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. स्मार्ट मीटर बळजबरीने बसविले जात असल्याच्या तक्रारी, वाढीव देयके, खासगीकरणाचा संशय आदींमुळे ग्राहकांमध्ये साशंकता आहे. स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा बसवलेला असल्याची अफवाही समाजमाध्यमांवर फिरत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने या सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण देत शंकांचे निरसन केले आहे. नाशिक परिमंडळात एकूण ४ लाख ६० हजार स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. घरगुती ग्राहकांना जून २०२६ या एका महिन्याच्या देयकात एकूण एक कोटी १२ लाख रुपयांची सवलत मिळाली.

महावितरणच्या टीओडी स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना लागू झालेल्या नवीन दरानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या विजेवर देयकात टीओडी सवलत लागू आहे. नाशिक परिमंडळात या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून वीज वितरण व्यवस्थेत या मीटरचा वापर वाढत आहे. ग्राहकांना त्याचे अनेक फायदे मिळत आहेत. स्मार्ट मीटर स्वयंचलित असल्याने रीडिंगसाठी मानवी हस्तक्षेपाची गरज राहत नाही. त्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी होते.

वीज वापराचे युनिट मोजण्याची पद्धत जुने आणि स्मार्ट दोन्ही मीटरमध्ये सारखीच आहे. दोन्ही मीटर इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे असल्याने युनिट मोजमापात कोणताही फरक पडत नाही. उन्हाळ्यात किंवा विजेचा वापर वाढल्यास देयक त्यानुसार वाढते. स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी अधिक विश्वासार्ह, अचूक आणि आधुनिक सुविधा ठरत असल्याचा दावा महावितरणने केला आहे. स्मार्ट टीओडी मीटरमध्ये कॅमेरा बसविलेला असल्याची अफवा समाजमाध्यमांवर फिरत असली, तरी ती चुकीची आहे. स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा नसतो. हे उपकरण केवळ घरातील वीज वापर मोजते आणि सुरक्षित नेटवर्कद्वारे त्याची माहिती वीज कंपनीकडे पाठवते, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

अवास्तव देयकांच्या तक्रारींमध्ये घट

स्मार्ट मीटरमुळे अवास्तव देयके येण्याच्या तक्रारींमध्ये घट झाली असून, देयक प्रक्रिया अधिक पारदर्शक झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. ग्राहकांच्या शंका असल्यास जुने आणि स्मार्ट मीटरची सिरिज तपासणी करून त्यांचे निरसन करण्यात येत आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना ‘लिकेज करंट’ किंवा ‘अर्थिंग’ यांसारख्या तांत्रिक अडचणींबाबत तत्काळ सूचना मिळते. त्यामुळे वेळेवर उपाययोजना करणे शक्य होते. हे मीटर पूर्णपणे मोफत बसविण्यात येते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सौर प्रकल्पातून निर्माण झालेल्या विजेचे मोजमापही स्मार्ट मीटर करते. त्यामुळे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी हे मीटर अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकांनी टीओडी सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.