जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत ७५ पैकी तब्बल ६९ जागा जिंकणाऱ्या महायुतीने विरोधकांना पुरते भुईसपाट केले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पाच जागा सोडल्या तर महाविकास आघाडीचे कुठेच नावनिशाण दिसून आलेले नाही. भाजपचे संकटमोचक नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आखलेली रणनीती खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरली आहे.

महानगरपालिकेच्या ७५ पैकी १२ जागांवर भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड निश्चित झाली होती. उर्वरित ६३ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीतही बहुतांश ठिकाणी महायुतीचेच वर्चस्व दिसून आले आहे. जागा वाटपावरून सुरू झालेल्या गोंधळानंतर महापालिकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाते की नाही, त्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. प्रत्यक्षात उत्तर महाराष्ट्रात कुठेच महायुती झाली नसताना, जळगावमध्ये अखेरच्या क्षणी भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूर जुळले. भाजपकडे सर्वाधिक ४७, शिंदे गटाकडे २२ आणि अजित पवार गटाकडे पाच जागा आल्या. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत पैकी भाजपच्या सहा आणि शिंदे गटाच्या सहा जागा बिनविरोध झाल्या. तब्बल १२ जागा बिनविरोध काढून मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी प्रभावी रणनीतीची चुणूक दाखवून दिली. प्रत्यक्ष निवडणुकीतही महायुतीने विजयी घोडदौड कायम ठेवत विरोधकांना पाचपेक्षा अधिक आकडा गाठू दिला नाही.

गद्दारांना बाहेरच ठेवले

गेल्या निवडणुकीवेळी तब्बल ५७ जागांवर निवडून आलेल्या भाजपकडून जळगाव शहरातील नागरिकांना विकासाची मोठी अपेक्षा होती. परंतु, बहुमत असतानाही पक्षाचे काही नगरसेवक फुटून विरोधी पक्षाला जाऊन मिळाल्याने भाजपला सत्तेपासून लांब राहावे लागले. भाजपला सत्तेपासून दूर नेणाऱ्या संबंधित सर्व गद्दार नगरसेवकांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा पहिला निर्णय मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला. दुसरीकडे ज्यांचा भाजपच्या नगरसेवकांना फोडून महापालिकेची सत्ता हिसकावण्यात सिंहाचा वाटा होता, त्या ठाकरे गटातील सुरेश जैन समर्थक अनेक मातब्बरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. अर्थातच, भाजपवर निष्ठा ठेवून असलेल्या अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महाजन यांच्या त्या धक्कादायक निर्णयाविषयी कुरबूर केली. यामुळे भाजपला निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, असे भाकीत वर्तविण्यात आले. मात्र, महाजन यांनी ज्या प्रभागात भाजपचा कधीच प्रभाव सिद्ध झाला नव्हता, अशा ठिकाणी बरोबर नेम साधला.

बंडखोरांचेही पंख छाटले

ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी द्यावी लागल्याने भाजपमधील अनेक जुन्या निष्ठावंतांना यंदाच्या निवडणुकीत तिकीट मिळाले नाही. त्यापैकी अनेकांनी नंतर बंडखोरी करून भाजपसमोर अडचणी उभ्या केल्या. परंतु, भाजप बंडखोरांनाही निवडणुकीत पुरून उरली. मतदानापूर्वी पक्षातून हकालपट्टी करून बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांचे पंख छाटण्याचे काम मंत्री महाजन यांनी केले. त्यामुळे, मतदारांमध्ये संबंधितांकडून असलेली विकास कामांची अपेक्षा आणि शाश्वती आपोआप कमी झाली. तशात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो दरम्यान विकसित जळगावचे स्वप्न दाखवून महायुतीच जळगाव शहराचा विकास करू शकते, अशी आशा मतदारांमध्ये निर्माण केली. आपसूकच मतदारांनी केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीला भरभरून मतदान केले.