नंदुरबार – शहादा तालुक्यातील घोडलेपाडा येथील सैन्यदलातील जवान मेजर रमेश सजन वसावे यांना राजस्थानमधील अजमेर या ठिकाणी वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय इतमामात घोडलेपाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहादा तालुक्यातील मंदाणे येथून तीन किलोमीटरवर घोडलेपाडा हे संपूर्ण आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे. बाराशे लोकवस्तीचा घोडलेपाडा चांदसैली ग्रुप ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. या पाड्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेजर रमेश वसावे यांना १० जून रोजी दुपारी कर्तव्यावर असताना अपघाती वीरमरण आले. त्यांनी पहिली ते दहावीपर्यंत सुलतानपूर येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेतले. अकरावी व बारावी शहादा येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात केल्यानंतर सैन्यदलात भरतीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. २००५ मध्ये त्यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली. पहिली नेमणूक जम्मू काश्मीर, त्यानंतर दिल्ली, चंदीगड, झारखंड, राजस्थानमधील भिलवाडा या ठिकाणी झाली. काही दिवसांपूर्वी त्यांची झारखंडमध्ये बदली झाली होती. त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुले दोन दिवसांपूर्वीच गावी परतले होते. रमेश झारखंडमध्ये बदलीच्या ठिकाणी रुजू होणार होते. भिलवाड्याजवळ त्यांच्या दुचाकीची मालमोटारीशी धडक झाली. या अपघातात त्यांचा मृ़त्यू झाला.

हेही वाचा – नाशिक: अज्ञात भ्रमणध्वनीच्या भडिमाराने नाशिकच्या ‘हंप्राठा’तील प्राध्यापक का त्रस्त आहेत ?

हेही वाचा – शिंदे गटाच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्याची माघार, नाशिक शिक्षक मतदारसंघ

मेजर वसावे यांच्या वडिलांचाही एका अपघातात मृत्यू झाला आहे. रमेश वसावे हे कुटुंबात ज्येष्ठ असल्याने आई, लहान दोन भावंडे, तीन बहिणी यांची जबाबदारी वडिलांनंतर त्यांच्यावर आली. मेजर वसावे यांना दोन मुलगे असून मोठा मुलगा तन्मय हा आठवीत नंदुरबार येथे तर दुसरा मुलगा नैतिक हा शहादा येथील विकास हायस्कूल येथे सहावीत आहे. पत्नी सीता या गृहिणी आहेत. भावाच्या मुलीला साक्षी त्यांनी दत्तक घेतले असून ती चौथीत आहे.
मेजर वसावे यांचे पार्थिव बुधवारी सकाळी गावी पोहोचल्यानंतर शासकीय पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. सीआरपीएफच्या वतीने हवेत तीनवेळा गोळी झाडत अखेरची मानवंदना देण्यात आली. पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहादा उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक शहादा, जिल्हा सैनिकी अधिकारी आदींनी पुष्पचक्र अर्पण केले.