मालेगाव : बहिणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांचा राग मनात धरून तिच्या प्रियकराचा चाकूने भोकसून निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला मालेगाव येथील सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षापूर्वी नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या खटल्याचा निकाल नुकताच लागला आहे.
सदर घटना ३० जून २०२० रोजी दुपारच्या सुमारास नांदगाव तालुक्यातील साकोरा वानरदेव चौफुलीवर घडली होती. फिर्यादी माया विजय शिंदे, तिचे पती विजय शिंदे आणि सासू हिराबाई शिंदे हे तिघे मोटरसायकलवरून नांदगावला जात होते. त्यावेळी आरोपी बंडू निवृत्ती हिलम, खंडू हिलम आणि पंगाबाई हिलम यांनी त्यांची मोटार सायकल रस्त्यात अडवली. त्यानंतर विजय यांच्यावर धारदार चाकूने हल्ला चढविण्यात आला होता.
मयत विजय शिंदे यांचे आरोपी बंडूच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. विजय हे सहा महिने तिच्यासोबत राहिले होते. नंतर तिला सोडून देण्यात आले होते. याबद्दल मनात राग धरून बंडूने विजय यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात विजय शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी माया शिंदे यांनाही मारहाण करण्यात आली होती तसेच निवृत्ती हिलम व पंगाबाई यांनी देखील शिवीगाळ केली,अशी तक्रार फिर्यादी माया शिंदे यांनी दिली होती.
या तक्रारीनुसार नांदगाव पोलिसांनी
बंडू हिलम, निवृत्ती हिलम व पंगाबाई हिलम यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मालेगाव येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच.अमेटा यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.
अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशोक पगारे यांनी सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासले. त्यांनी मांडलेला प्रखर युक्तिवाद आणि ठोस पुराव्यांमुळे न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. त्यानुसार मुख्य आरोपी बंडू हिलम याला भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी निवृत्ती हिलम आणि पंगाबाई हिलम यांची मात्र पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्याकडे नांदगाव तालुक्याचे लक्ष लागून होते.
