Who Are The Real Culprits Of Malegaon / मालेगाव : २००६च्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोटातील ९ संशयीतांची याआधी विशेष न्यायालयात निर्दोष मुक्तता झाली होती. आता या प्रकरणातील चार संशयीतांवरील आरोपपत्र देखील मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्दबातल ठरविले आहे. त्याचे मालेगाव शहरात तीव्र पडसाद उमटत असून, या घटनेतील खरे गुन्हेगार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
८ सप्टेंबर २००६ रोजी शब्बे-ए-बारात या सणाच्या दिवशी येथील बडा कब्रस्तान,हमिदिया मशीद परिसरात मुस्लीम बांधव दुपारी नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. तेव्हा एकामागून एक शक्तिशाली स्फोट झाले. या स्फोटांमध्ये ३१ निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेने प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
या प्रकरणाचा तपास गेल्या १९ वर्षांत तीन वेगवेगळ्या यंत्रणांनी केला, मात्र कोणाचेही दोषारोप न्यायालयात टिकू शकले नसल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नऊ मुस्लिम तरुणांना याप्रकरणी अटक केली होती. २००७ मध्ये सीबीआयने तपास हाती घेतल्यावर त्यांनीही याच सिद्धांतानुसार तपास पुढे गेला. मात्र, २०११ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तपास हाती घेतला आणि एटीएसचा दावा पूर्णपणे खोडून काढला.
एनआयएने ९ मुस्लिम तरुणांना निर्दोष ठरवत, या स्फोटामागे हिंदू कार्यकर्त्यांचा हात असल्याचा दावा केला. त्यानुसार मध्यप्रदेशातील मनोहर नरवारिया, राजेंद्र चौधरी, धनसिंग आणि लोकेश शर्मा यांना २०१३ मध्ये अटक झाली. सहा वर्षे तुरुंगात राहिल्यावर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.
याप्रकरणी विशेष न्यायालयाने गेल्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी मनोहर नरवारिया, राजेंद्र चौधरी, धनसिंग आणि लोकेश शर्मा या चौघांविरुद्ध हत्या, गुन्हेगारी कट आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यान्वये आरोप निश्चित केले होते. या निर्णयाला संशयीतांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने अपील मान्य करत विशेष न्यायालयाने त्यांच्यावर ठेवलेले सर्व आरोप रद्दबातल ठरविले. ठोस पुराव्यांचा अभाव आणि केवळ जुन्या जबाबांवर आधारित खटला चालवता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
या प्रकरणात सुरुवातीला अटक झालेल्या ९ मुस्लिम तरुणांची विशेष न्यायालयाने २०१६ मध्ये निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. ही सुनावणी सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. मालेगावात २००६ आणि २००८ अशा दोन वेळा बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. २००८ मध्ये भिक्कू चौकात घडलेल्या दुसऱ्या स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींची विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी गेल्या वर्षी मुक्तता केली आहे.
या पार्श्वभूमीवर २००६ च्या प्रकरणातही तसेच घडल्याने, “३१ जणांचे जीव घेणारे आणि ३०० जणांना जखमी करणारे खरे गुन्हेगार कोण?” हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ९ मुस्लिम तरुणांना निर्दोष सोडणाऱ्या निकालाला उच्च न्यायालयात जसे आव्हान देण्यात आले आहे, तसेच आताच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे, अशी मागणी जमेतूल उलेमा या मुस्लिम संघटनेचे जिल्हाध्यक्ष मौलाना अब्दुल कय्युम कासमी यांनी केली आहे.
