मालेगाव: शेताच्या सुपीकतेसाठी पाझर तलावातून गाळ काढण्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या एका शासकीय कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठा दणका दिला आहे. मालेगाव येथील मृद व जलसंधारण उपविभागातील कनिष्ठ लिपिक श्रीकांत पाटील याला ५,००० रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदाराच्या मित्राने आपले शेत सुपीक करण्यासाठी नांदगाव तालुक्यातील घोरपडी पाझर तलावातून गाळ काढण्याकरिता मालेगाव येथील उपविभागीय मृद व जलसंधारण उपविभागाकडे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना गाळ काढण्याची रीतसर परवानगी देखील मिळाली होती. या गाळ उपसाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा इंधन खर्च शासनाकडून दिला जातो. त्या अनुषंगाने वाहनांचे डिझेल बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात, या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक श्रीकांत काशिनाथ पाटील (वय ३६, रा. धुळे) याने तक्रारदाराकडे ५,००० रुपयांची लाच मागितली होती.
असा लावला सापळा
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने ८ जुलै २०२६ रोजी मालेगाव येथील संबंधित कार्यालयातच सापळा रचला. तेव्हा पंचांसमक्ष ५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना श्रीकांत पाटील याला पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी येथील कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटील याला अटक करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम आणि समीर शेख यांचा सहभाग होता. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर हे काम करीत आहेत. दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणी लोकसेवक लाच मागत असेल, तर नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक: १०६४ ,व्हॉट्सॲप क्रमांक: ९९३०९९७७००, दूरध्वनी: ०२५३-२५७५६२८ / २५७८२३० किंवावेबसाईट: acbmaharashtra.gov.in येथे संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.
