मालेगाव: शहरातील कापड व्यापाऱ्याला १० कोटी रुपयांचे बँक कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून, तब्बल ३० लाख ३० हजार ५७५ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील छावणी पोलीस ठाण्यात रुषी सोनारा नावाच्या संशयीताविरोधात फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आझादनगर परिसरातील रहिवासी व कापड व्यावसायिक जैद हारीस शकिल अहमद (वय ४६) यांना आपल्या व्यवसायासाठी १० कोटी रुपये कर्जाची आवश्यकता होती. याच दरम्यान गेल्या जानेवारी महिन्यात त्यांना रुषी सोनारा नावाच्या व्यक्तीने फोन करून आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत कर्ज देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये संशयीताने ई-मेलवरून व्यापाऱ्याकडून पॅन कार्ड, मालमत्तेची कागदपत्रे आणि आयकर विवरण मागवून घेतले.
कर्ज मंजुरी पत्रानंतर आर्थिक गंडा
कागदपत्रे मिळताच संशयीताने व्यापाऱ्याच्या ई-मेल व व्हॉट्सॲपवर आधी कर्ज मंजुरीपूर्व पत्र आणि त्यानंतर ९ कोटी ९० लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे अंतिम पत्र पाठवले. कर्ज मंजूर झाल्याचे भासवून संशयीताने सर्च रिपोर्ट, व्हॅल्युएशन आणि प्रोसेसिंग फीच्या नावाखाली विविध हप्त्यांमध्ये पैसे मागितले. श्रीनाथ ज्वेलर्स आणि डेस्टीनेशन ज्वेलरी यांच्या नावे असलेल्या ॲक्सिस,आयसीआयसीआय व स्टेट बँकेच्या खात्यांवर वेळोवेळी पैसे भरण्यास लावले. अशाप्रकारे २० मार्च २०२६ ते ४ जून २०२६ या कालावधीत व्यापाऱ्याकडून संशयीताने एकूण ३०,३०,५७५ रुपये उकळले.
भांडं फुटले तेव्हा ‘गेम’ करण्याचा दम
पैसे भरूनही कर्जाची रक्कम खात्यात जमा न झाल्याने व्यापाऱ्याला संशय आला. मुंबईच्या माहिम येथील बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी केली असता, ‘रुषी सोनारा’ नावाची कोणतीही व्यक्ती बँकेत कार्यरत नसल्याचे आणि फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्याच्या निदर्शनास आले. तेव्हा पैसे परत मागितले असता संशयीताने ‘तुला काय करायचे ते कर, पुन्हा फोन केला तर तुझा गेम करून टाकेल’ असा दम व्यापाऱ्याला दिला. यानंतर पोलिसांत तक्रार दिल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
