मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे गेली दोन दिवस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. शहरातील हिंदू बहुल भागात इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचे बघावयास मिळाले. दुसरीकडे मुस्लिम बहुल भागात मात्र अनेक ठिकाणी भाजपकडे उमेदवारांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानिक पातळीवर मुलाखत प्रक्रिया पार पडल्यावर सर्वच इच्छुकांची नावे पक्षाच्या प्रदेश शाखेकडे पाठविण्यात आली आहेत. त्यानंतर सर्वेक्षणाच्या आधारे प्रत्येक जागेसाठी एका उमेदवाराच्या नावावर प्रदेश शाखेकडून शिक्कामोर्तब केले जाणार आहे. दरम्यान इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान मालेगावात पक्षांतर्गत ‘रुसवा फुगवा’ झाल्याचे समोर आले आहे.
राज्यातील महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांची आगामी महापालिका निवडणुकीसाठी मालेगावमध्ये युती होण्याची शक्यता जवळपास मावळल्याने भाजपतर्फे स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या २१ प्रभागांमधील सर्व ८४ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार भाजपतर्फे करण्यात आला आहे.
त्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर १४ व १५ डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपतर्फे मालेगावसाठी नियुक्त करण्यात आलेले संघटनात्मक जिल्हाप्रमुख दादा जाधव, ज्येष्ठ नेते सुरेश निकम, नंदूतात्या सोयगावकर, डॉ. तुषार शेवाळे, भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, दीपक पवार, लकी गिल आदी पदाधिकारी व स्थानिक नेत्यांनी या मुलाखती घेतल्या. इच्छुकांचे आजवरचे सामाजिक व पक्षीय कार्य, पक्षासाठी योगदान आदी घटक या मुलाखतीच्या निमित्ताने तपासण्यात आले.
रविवारी पहिल्या दिवशी हिंदूबहुल भागातील एकूण २२ जागांसाठी इच्छुक असलेल्या जवळपास सव्वाशे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सोमवारी मुस्लिम बहुल भागातील ६२ जागांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हिंदू बहुल भागात भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणच्या उमेदवारीसाठी एका जागेकरीता चार,चार ते पाच,पाच जण इच्छुक असल्याचे चित्र आहे. मुस्लिम बहुल भागात मात्र परिस्थिती उलटी आहे. याठिकाणी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये निरुत्साह असल्याचे आढळून आले. या भागातील ६२ जागांसाठी जेमतेम ३० इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
इच्छुकांच्या मुलाखतीसाठी तीन पॅनल्स तयार करण्यात आले होते. या पॅनलमध्ये स्थानिक पातळीवरील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. मुलाखतीसाठीच्या पॅनलमध्ये भाजपचे जेष्ठ नेते व माजी नगरसेवक सुनील गायकवाड यांचा समावेश केला गेलेला नव्हता. त्यामुळे गायकवाड यांनी समाज माध्यमांद्वारे जाहीर नाराजी प्रकट केली.
गायकवाड यांचा मालेगाव महापालिकेच्या राजकारणात स्वतःचा दबदबा आहे. अशा स्थितीत मुलाखती घेणाऱ्या पॅनलमध्ये समावेश नसणे, हा आपला अपमान असल्याची भावना व्यक्त करत किती दिवस हा अपमान सहन करावा,असा थेट सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपचे संघटनात्मक जिल्हाप्रमुख दादा जाधव यांनी गायकवाड यांचा मुलाखतीच्या पॅनमध्ये का समावेश केला गेला नाही, याचे स्पष्टीकरण दिले आहे.
निवडणुकीसाठी जे पदाधिकारी इच्छुक आहेत, त्यांचा मुलाखतीसाठी गठीत केलेल्या पॅनल्समध्ये समावेश न करण्याचे धोरण ठरले आहे. त्यानुसार गायकवाड यांचा पॅनलमध्ये समावेश केला गेला नाही, असे त्यांनी नमूद केले. पक्षाचे महानगरप्रमुख देवा पाटील यांचा देखील याच धोरणानुसार मुलाखतीच्या पॅनलमध्ये समावेश केला गेला नव्हता, याकडे देखील जाधव याने लक्ष वेधले.
