मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी झालेला भाजप आणि काँग्रेसचा ऐतिहासिक ‘निकाह’ सोमवारी घटस्फोटापर्यंत पोहोचला आहे. ‘भारतीय विकास आघाडी’ या नावाखाली एकत्र आलेल्या या दोन परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांमधील मैत्री अवघ्या ७२ तासांत संपुष्टात आली आहे. भाजपच्या दोन्ही सदस्यांनी या गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

​देशपातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसने मालेगावात एकत्र येत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. काँग्रेसचे तीन व भाजपचे दोन अशा पाच जणांनी हा गट स्थापन केला होता. काँग्रेसचे एजाज बेग हे या गटाचे नेते होते. मात्र, ही युती नैसर्गिक नसल्याची टीका कार्यकर्त्यांकडून आणि वरिष्ठ स्तरावरून होत होती. सोमवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांनी भाजपच्या दोन्ही सदस्यांना सोबत घेऊन नाशिकचे विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. नगरसेवक मदन गायकवाड यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात येत असल्याचे पत्र कचवे यांनी विभागीय आयुक्तांना दिले.

आधीचा गट घटनाबाह्य

भाजप आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे भिन्न आहे, त्यामुळे महापालिकेत आम्ही काँग्रेस सोबत गट स्थापन करणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांनी दिले आहे. भारतीय विकास आघाडी या नावाने याआधी जो गट स्थापन केला गेला होता, त्याचा पक्षाशी काही एक संबंध नाही. तसेच अशा प्रकारे गटाची स्थापना व नोंदणी ही घटनाबाह्य होती. त्यामुळे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार सोमवारी भाजप गटाची रीतसर नोंदणी करण्यात आली आहे,असे कचवे यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे काँग्रेसच्या तीन व भाजपच्या दोन सदस्यांनी शुक्रवारी केलेली गट नोंदणी आता तांत्रिकदृष्ट्या अडचणीत आली असून, महापालिकेतील सत्ता स्थापनेची समीकरणे पुन्हा दोलायमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​ सेक्युलर फ्रंटची वाढली डोकेदुखी

सेक्युलर फ्रंट या आघाडीचे संख्याबळ ४० आहे. बहुमताचा ४३ हा आकडा गाठण्यासाठी आघाडीतर्फे रणनीती आखण्यात आली. त्यानुसार काँग्रेसच्या तीन सदस्यांना आपल्याकडे वळविण्यात आघाडीला यश आले. दरम्यान भाजपच्या दोन सदस्यांनी काँग्रेस बरोबर गट स्थापन केला होता. त्यामुळे काँग्रेसचे ३ आणि भाजपच्या २ अशा पाच सदस्यांच्या पाठिंब्यामुळे इस्लाम पक्षाच्या (सेक्युलर फ्रंट) आघाडीचे संख्याबळ ४५ पर्यंत पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता भाजपचा काडीमोड व स्वतंत्र गट स्थापन करण्याचा पवित्रा यामुळे आघाडीचे हे संख्याबळ ४३ वर आले आहे.

​ बहुमताची टांगती तलवार

बहुमतासाठी ४३ चा आकडा आवश्यक आहे. आज तेवढे संख्याबळ या आघाडीकडे उपलब्ध असल्याचे वरकरणी दिसत आहे. मात्र,त्यात काही दगाफटका झाला तर, काय असा प्रश्न निर्माण होत आहे. जर भाजपच्या दोन सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली नाही आणि पडद्याआड अन्य हालचाली घडून आल्या तर, सेक्युलर फ्रंटची सत्ता स्थापन करण्यासाठीची वाट अवघड होऊ शकते,अशी शक्यता निर्माण झाली आहे. एमआयएम आणि शिवसेना (शिंदे गट) हे दोन्ही पक्ष या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून,भाजपच्या बदललेल्या भूमिकेमुळे सत्तेच्या सारीपाटावर नवा डाव मांडण्याची संधी त्यांना उपलब्ध होण्याची शक्यता दिसत आहे.