मालेगाव: देशातील तरुण पिढीला मादक पदार्थांच्या व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी आणि ‘विकसित भारत’चा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चातर्फे येथील अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले आहे. मालेगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू,भेसळयुक्त ताडी व प्रतिबंधित गुटखा विक्रीला लगाम लावावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मालेगाव शहर व तालुक्यात अवैध गुटखा,भेसळयुक्त ताडी व गावठी दारू विक्रीचा धंदा जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. अशा पदार्थांवर पोलीस कारवाई करत असली तरी, काळ्या बाजारात आणि लपून-छपून अनेक ठिकाणी या मादक पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे चित्र आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने त्याची दखल घेऊन बेकायदेशीर मद्यविक्री,भेसळयुक्त ताडी आणि गुटख्याविरुद्ध सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येत संयुक्त धडक कारवाई करावी, अशी सूचना या निवेदनात करण्यात आली आहे. या संदर्भात मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी,राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि महापालिका आयुक्त यांनाही निवेदने देण्यात आली आहेत.

कारवाईचे स्वागत पण..

गेल्या ​दिनांक २७ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाने मालेगाव तालुक्यातील काही ताडी विक्री केंद्रांवर धडक कारवाई करून २,३०२ लिटर संशयीत व भेसळयुक्त ताडी जप्त करून नष्ट केली होती. या कारवाईचे महिला मोर्चाने स्वागत केले आहे. परंतु अद्यापही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त ताडी विक्री होत असल्याची तक्रार महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे. मालेगाव तालुका परिसरात ताड झाडांचे अत्यल्प प्रमाण असताना त्या तुलनेत ताडी विक्री कैक पटीने अधिक होत असल्याकडे महीला मोर्चातर्फे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे घातक रसायने वापरून भेसळयुक्त ताडीचे उत्पादन होत असल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे. अशा भेसळयुक्त ताडीच्या सेवनामुळे अनेक तरुणांना घातक आजार जडल्याची तक्रार देखील मोर्चातर्फे करण्यात आली आहे.

व्यापक जनजागृती व ठोस कारवाईची गरज

अवैध दारु व गुटखा,भेसळयुक्त ताडी अशा घातक पदार्थांमुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून त्याचा सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक,कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि महापालिका स्तरावर व्यसनमुक्ती शपथ, व्याख्याने, पथनाट्य व रॅली आयोजित करुन व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. तसेच पोलीस, उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासनातर्फे अवैध धंद्यांवर संयुक्तपणे कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आली आहे. या प्रसंगी भाजपा जेष्ठ नेते सुरेश निकम,भाजप प्रदेश महिला मोर्चा सदस्य सुरेखा भुसे, भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ट जिल्हा संयोजक अरुण पाटील, कायदा आघाडीचे ॲड.चंद्रशेखर शेवाळे, साधना वाजपेयी, उज्ज्वला वाघमोडे आदी उपस्थित होते.