मालेगाव:  इस्लाम पार्टीचे प्रमुख तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेण्याचा प्रकार घडला आहे. त्या विरोधात मालेगाव शहरात तीव्र पडसाद उमटले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगजेबचा उदो-उदो करणाऱ्या शेख यांच्या मानसिकतेला विरोध म्हणून भाजपतर्फे शहराध्यक्ष देवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

इस्लाम पक्षाचे संस्थापक आसिफ शेख हे सोमवारी संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. मालेगाव महापालिकेत सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या पहिल्या राज्य संमेलनात इस्लाम पक्षाचा मालेगाव बाहेर विस्तार करण्याचा इरादा शेख यांनी बोलून दाखवला होता. या पक्ष विस्ताराची तयारी म्हणून शेख यांनी संभाजीनगरचा हा दौरा केला. तेथील कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावरून शेख हे एका इफ्तार पार्टीत सहभागी झाले. तत्पूर्वी वाटेत खुलताबाद येथे औरंगजेबच्या कबरीचे त्यांनी दर्शन घेतले. त्या विरोधात मालेगावात तीव्र पडसाद उमटले आहेत. ​सध्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सुरू आहे. ज्या औरंगजेबाने धर्मवीरांचा अनन्वित छळ केला, त्याच औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आसिफ शेख यांनी नतमस्तक होणे, हा हिंदूंच्या भावना दुखावणारा प्रकार असल्याचे भाजपने म्हटले आहे. अशा विकृत मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि म्हणूनच आज या प्रवृत्तीचे होळीच्या निमित्ताने दहन करण्यात आले,असे देवा पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

​ महापालिका,वीज कंपनी देखील लक्ष्य

​धार्मिक अस्मितेबरोबरच स्थानिक नागरी प्रश्नांवरही भाजपने प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मालेगाव महानगरपालिकेतील ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या भ्रष्टाचाराचे प्रतिकात्मक दहन करून भाजपतर्फे याप्रसंगी संताप व्यक्त करण्यात आला. महापालिकेच्या कामाकाजातील त्रुटींमुळे नागरिकांना होणारा त्रास तातडीने कमी करावा, असा आग्रह यावेळी धरण्यात आला. याशिवाय भाजप कार्यकर्त्यांनी याप्रसंगी मालेगाव येथील खाजगी वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ व भ्रष्ट कारभाराविरोधातही खदखद व्यक्त केली. खाजगी वीज वितरण कंपनीकडून नागरिकांची जी आर्थिक लूट सुरू आहे, ती त्वरित थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिकेतील भ्रष्टाचाररुपी राक्षस व वीज कंपनीकडून ग्राहकांची होणारी लूट यांचे प्रतीकात्मक दहन यावेळी करण्यात आले.

आंदोलनस्थळी मार्मिक बॅनर

प्रतिकात्मक दहन आंदोलनस्थळी लावण्यात आलेले मार्मिक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शहरातील भ्रष्ट कारभार थांबवा आणि जनतेची लूट करणाऱ्यांवर कारवाई करा अशा आशयाचे फलक यावेळी झळकवण्यात आले. ​या आंदोलनामुळे मालेगावातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आगामी काळातही या मुद्द्यांवरून रान पेटवण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला. या प्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते भरत पोपळे,दादा जाधव, हरिप्रसाद गुप्ता, संदीप भुसे, जगदिश गोऱ्हे, भाग्येश वैद्य, श्याम गांगुर्डे, भाग्यश कासार, सुरेखा भुसे, राजिया शेख, दिलीप पाथरे, अनिल पाटील, कुणाल निकम, प्रवीण खैरनार, अनंत निकम यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.