मालेगाव: इराणचे सर्वोच्च नेते आणि शिया समुदायाचे जागतिक धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनी यांचे अमेरिका आणि इस्राईलच्या हल्ल्यात निधन झाल्याच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले असून, मालेगाव शहरात शिया समुदायाकडून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. तसेच खोमेनी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरात काही ठिकाणी बॅनर झळकले. तसेच शहरात कॅन्डल मार्च काढून खोमेनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गेल्या २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्राईलकडून झालेल्या लष्करी कारवाईत खामेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या वृत्ताने मालेगावातील शिया बांधवांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि संताप पाहायला मिळत आहे. त्यानंतर शहरातील हुसेनी मशिद भागात अयातुल्ला अली खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण करणारे मोठमोठे फलक (बॅनर्स) झळकले आहेत. या फलकांवरून त्यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.
कॅन्डल मार्च आणि निषेध
सोमवारी रात्री उशिरा मालेगावच्या रस्त्यांवर एक मोठा ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आला. हुसेनी मशिद ट्रस्टपासून सुरू झालेला हा मोर्चा शिया समुदाय कब्रस्थानापर्यंत शांततेत पार पडला. हातात मेणबत्त्या व खोमेनी यांची छायाचित्रे घेऊन मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि तरुण या मार्चमध्ये सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी अमेरिका आणि इस्राईलच्या आक्रमक धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
हा हल्ला केवळ एका देशावर नसून मानवी मूल्यांवर आहे,अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. अमेरिका व इस्राइल हे जगावर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचा फटका केवळ इराणलाच नव्हे तर जगातील अनेक देशांना बसत असल्याची टीका कॅन्डल मार्चमध्ये सामील झालेल्या लोकांनी केली. टेरिफच्या माध्यमातून भारताला देखील अमेरिकन धोरणांचा फटका बसत असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
भारताने इराणच्या पाठीमागे उभे राहावे
या कॅन्डल मार्चच्या निमित्ताने भारताच्या इराणशी असलेल्या संबंधांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला गेला. भारत व इराण या दोन देशात पूर्वीपासून चांगले संबंध राहिले आहेत. इतकेच नव्हे तर भारत व पाकिस्तानमध्ये आजवर जे वाद झाले, त्यात इराणने नेहमीच भारताची बाजू घेतली आहे. त्यामुळे भारताने आज इराणच्या बाजूने उभे राहावे, अशी अपेक्षा कॅन्डल मार्चच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.
धर्मगुरू सय्यद अझहर अब्बास नकवी यांच्या नेतृत्वाखाली हा कॅन्डल मार्च करण्यात आला. त्यात आरिफ हुसेन सज्जाद हुसेन, सदादत हुसेन नासिर हुसेन, सलमान अख्तर शब्बीर अहमद, असिफ हुसेन मेहंदी हुसेन, करार हुसेन शाकीर हुसेन, समाजवादी पार्टीचे मुस्तकीम डीग्निटी, इस्लाम पार्टीचे महापालिकेतील गटनेते खालीद शेख रशीद शेख आदी सामील झाले होते.
