मालेगाव : गेल्या महिन्यात येथील बच्छाव सर्कल परिसरात चाकूचा धाक दाखवून वाटसरुचा मोबाईल लुटण्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना छावणी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोबाईल चोरट्यांच्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २५ महागडे मोबाईल संच आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी असा ३.४८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
गेल्या ११ जुलै २०२६ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शंकर दिलीप पवार (रा. पिंपळगाव तालुका मालेगाव) हे मालेगाव ते सटाणा रस्त्याने दुचाकीवरून जात असताना बच्छाव सर्कल जवळ पल्सर दुचाकीवरून आलेल्या २ भामट्यांनी त्यांना गाठले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील साडेबारा हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून त्यांनी पोबारा केला होता. पवार यांनी यासंदर्भात तक्रार दिल्यावर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना छावणी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन अथर्व उर्फ बंटी राजेंद्र धनवटे (वय २२, रा. स्वप्नपूर्ती नगर, मालेगाव), प्रदीप दादाजी धिवरे (वय १८, रा. लखमापूर, ता. सटाणा), एक विधीसंघर्षीत बालक (वय १७, रा. साईबाबा नगर, मालेगाव) व प्रेम भटु देवरे (वय १८, रा. क्रांती फुलेनगर, मालेगाव) या संशयीतांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अधिक चौकशी केल्यावर या टोळीने यापूर्वी देखील अशाच पद्धतीने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.
३.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस तपासात आरोपींकडून विविध नामांकित कंपन्यांचे २५ जुने वापरते मोबाईल फोन (किंमत रु. २ लाख ५८ हजार) आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटारसायकल किंमत ९० हजार रुपये असा एकूण ३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ व साहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप, साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व उपनिरीक्षक रोहिदास हिरे यांच्या नेतृत्वाखालील हवालदार पंकज डोंगरे, नितीन अहिरे, विलास बागडे, शरद भुसनर, शांतीलाल जगताप, भूषण अहिरे, प्रसाद देसले, भरत गांगुर्डे, सुजित पोटींदे, विलास पाटील,नितेश खैरनार व सलमान खाटीक यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.
