मालेगाव : गुरुवारी होणारी महापालिका निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष नियोजन करण्यात आले असून त्यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.
महापालिकेच्या ८४ पैकी ८३ जागांवर ही निवडणूक होत आहे. त्यासाठी विविध पक्ष आणि अपक्ष असे एकूण ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. एका जागेवरील निवडणूक बिनविरोध झाली आहे. ८ वर्षांनी होणारी ही निवडणूक विविध पक्ष व नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. संवेदनशील मालेगावात निवडणूक शांततेत पार पाडणे,ही पोलिसांच्या दृष्टीने नेहमीच आव्हानात्मक बाब असते. शहराची ही पार्श्वभूमी बघता जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीकडे पोलिसांकडून काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे.
तगडा बंदोबस्त
शहरात १२८ इमारतींमध्ये एकूण ६०९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील ४१ इमारतींमधील २६४ केंद्रे ही संवेदनशील व अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. १५ तारखेस होणारे मतदान व १६ तारखेस होणारी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांतर्फे आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ८ उपविभागीय पोलीस अधिकारी,२ प्रशिक्षणार्थी उप अधीक्षक, १७ पोलीस निरीक्षक,६८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक,११६८ पोलीस अंमलदार ९०० होमगार्ड्स, २ आर.सी.पी. प्लाटून आणि २ एसआरपीएफ. कंपन्या असा तगडा बंदोबस्त शहरात लावण्यात येणार आहे.
गुन्हेगारांवर जरब
निवडणुकीच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांविरुद्ध कठोर पाऊले उचलली जात आहेत. भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ अंतर्गत ८३ गुन्हेगारांना १६ जानेवारीपर्यंत शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तसेच ७२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून ७ फरार आरोपींना देखील जेरबंद करण्यात आले आहे. निवडणूक आचारसंहिता काळात पोलिसांनी अवैध दारू, अमली पदार्थ आणि शस्त्रांविरुद्ध मोठी मोहीम राबवली आहे. त्यात ७९ कारवायांमध्ये १०९९ लिटर अवैध दारू (किंमत ३.७२ लाख रु.),७५ ग्रॅम एम.डी. पावडर आणि ४ किलो भांग (किंमत ६.४५ लाख रु.) असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच ४६.६३ लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. २ गावठी पिस्तूल, ८ काडतूसे, ४ धारदार चाकू व ७ तलवारी असे शस्त्रास्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी काय केले आवाहन
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडवी म्हणून पोलीस प्रशासनाने लोकांसाठी काही महत्वाचे नियम घालून दिले आहेत. यामध्ये मतदान केंद्रावर विनाकारण गर्दी न करणे, पैशांच्या आमिषाला बळी न पडणे,कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवणे, बोगस मतदानाला अटकाव करणे, यांचा समावेश आहे. लोकशाहीचा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधू यांनी केले आहे.
