मालेगाव : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना मालेगावमध्ये घडली आहे. येथील एका नामांकित महाविद्यालयात एका साहाय्यक प्राध्यापकाने परीक्षा सुरू असताना विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संशयित साहाय्यक प्राध्यापकाला तातडीने अटक केली आहे.
वाजिद अली असे संशयिताचे नाव असून, तो संबंधित महाविद्यालयामध्ये उर्दू विषयात तासिका तत्त्वावर साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याने द्वितीय वर्षातील एका विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या सत्र परीक्षा सुरू आहेत. पीडित विद्यार्थिनी तिच्या प्रथम वर्षातील एका ‘बॅकलॉक’ विषयाची परीक्षा देत असताना हा प्रकार घडला.
सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत झालेल्या पेपरसाठी संशयीत प्राध्यापकाची एका वर्गावर पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पेपर संपल्याने दुपारी १२ वाजेपूर्वी वर्गातील इतर सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर निघून गेले होते. मात्र,तक्रारदार विद्यार्थिनीचा पेपर पूर्ण व्हायचा बाकी असल्याने ती वर्गात शेवटपर्यंत बसून पेपर लिहित होती. यावेळी वर्गात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित प्राध्यापकाने या विद्यार्थिनीजवळ जाऊन तिच्याकडे अश्लील मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनी सुरुवातीला हादरून गेली, मात्र तिने न डगमगता तातडीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे धाव घेत घडलेला प्रकार त्यांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून प्राचार्यांनी कॅम्प पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तात्काळ महाविद्यालयात धाव घेत संशयित प्राध्यापकाला ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनीचे नातेवाईक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते महाविद्यालयात जमा झाले. संशयित प्राध्यापकावर कठोर कारवाई करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. मालेगाव कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून वाजिद अली यास अटक केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजया पवार या पुढील तपास करीत आहेत.
महाविद्यालयीन व संबंधित संस्थेच्या प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून साहाय्यक प्राध्यापक वाजिद अली यास तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई केली आहे. तसेच या प्रकाराच्या सखोल चौकशीसाठी महाविद्यालयीन स्तरावर तीन सदस्यीय आणि संस्था स्तरावर चार सदस्यीय समितीची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
